चंद्रावर जाणारे पहिले भारतवंशी बनण्याची अनिल मेनन यांना संधी

अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने त्यांच्या आगामी मून मिशन साठी १० अंतराळवीरांची निवड केली असून त्यात भारतीय वंशाचे अनिल मेनन यांचा समावेश आहे. ४५ वर्षीय मेनन नासाच्या क्लास २०२१ मध्ये सहभागी होत असून ते अमेरिकेन एअरफोर्स मध्ये लेफ्टनंट कर्नल आहेत. तसेच स्पेसएक्सच्या फ्लाईट साठी त्यांनी फ्लाईट सर्जन म्हणूनही काम केले आहे. नासा ने मून मिशन साठी मागविलेल्या अर्जांना प्रचंड प्रतिसाद आला आणि १२ हजार अर्ज आले. त्यातून १० लोकांची निवड करण्यात आली असून त्यात मेनन यांचा समावेश आहे. या दहा जणांत ६ पुरुष आणि चार महिला आहेत.

नासा ५० वर्षानंतर पुन्हा एकदा चंद्रावर माणूस पाठविण्याची तयारी करत असून याला मून मिशन असे नाव दिले गेले आहे. अनिल मेनन यांनी भारतात सुद्धा काही काळ काम केले आहे. पोलिओ अभियानाचा अभ्यास आणि त्याला सपोर्ट करण्यासाठी ते भारतात आले होते. चंद्रावर अजून कुणी भारतीय अंतराळवीर गेलेला नाही.२०२४ मध्ये नासा चार अंतराळवीरांना चंद्र मोहिमेवर पाठविणार आहे. त्यात अनिल यांचा नंबर लागला तर चंद्रावर जाणारे ते पहिले भारतवंशी बनतील. यापूर्वी चार भारतीयांनी अंतराळ प्रवास केला आहे. त्यात राकेश शर्मा हे पहिले होते. त्यानंतर कल्पना चावला, सुनिता विलियम्स आणि राजा चारी यांनी ही कामगिरी केली आहे.

जानेवारी मध्ये चंद्र मोहिमेसाठी निवड झालेल्या अंतराळवीरांचे प्रशिक्षण सुरु होणार असून ते दोन वर्षे चालेल. २०२४ च्या या मिशनमध्ये एक महिला सुद्धा सामील असेल. अनिल यांचे आईवडील भारतीय आणि युक्रेनियन आहेत. १९९९ मध्ये अनिल यांनी हॉवर्ड मधून न्युरोबायोलॉजी पदवी घेतली आहे आणि २००४ मध्ये स्टॅनफर्ड मधून मेकॅनिकल इंजिनीअर आणि येथूनच मेडिकल स्कूल मधून डॉक्टर पदवी घेतली आहे. नासा साठी त्यांनी अनेक मोहिमात क्रू फ्लाईट सर्जन म्हणून काम केले आहे. २०१८ मध्ये त्यांनी मस्क यांच्या स्पेस एक्स मध्ये काम करायला सुरवात केली आणि स्टारशिपचे निर्माण, अंतराळ कार्यक्रम आणि लाँच कार्यक्रमात योगदान दिले आहे.