यंदाचा गदिमा पुरस्कार नाना पाटेकर यांना जाहीर


मुंबई – ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना यंदाच्या वर्षी गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठीत गदिमा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांना गदिमा प्रतिष्ठानाकडून देण्यात येणारा गृहिणी सखी सचिव पुरस्कार देण्यात येणार आहे. गदिमा प्रतिष्ठानचे कार्यक्रारी विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत याबाबतची घोषणा केली.

गेल्या अनेक वर्षांपासून नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून अभिनेते नाना पाटेकर राज्यातील दुष्काळग्रस्त गावांना मदत करत आहे. आतापर्यंत अनेक दुष्काळग्रस्त गावे त्यांनी दत्तक घेतली आहेत. तसेच अनेक गावांना ते सढळ हस्ते मदत करतात. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचा प्रतिष्ठित गदिमा पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे.

त्याचबरोबर अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांना गदिमा प्रतिष्ठानाकडून देण्यात येणारा गृहिणी सखी सचिव हा पुरस्कार यंदा देण्यात येणार आहे. तर गदिमा चैत्रबन पुरस्कार हा ज्येष्ठ संगीतकार कौशल इनामदार यांना प्रदान केला जाणार आहे. तसेच स्व. विद्या माडगूळकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा विद्या प्रज्ञा पुरस्काराने गायिका रश्मी मोघे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

दरम्यान यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात येत्या मंगळवारी १४ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. या पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते होणार आहे. या पुरस्काराचे स्वरुप २१ हजार रुपये सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे असणार आहे.