ओमिक्रॉन व्हेरिएंट फेब्रुवारीमध्ये गाठणार उच्चांक, पण दुसऱ्या लाटेपेक्षा सौम्य स्वरुपाची असेल तिसरी लाट


नवी दिल्ली – सध्या जगभरात कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या प्रादुर्भावामुळे चिंतेचे वातावरण आहे. या व्हेरिएंटमुळे लवकरच कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. ही तिसरी लाट फेब्रुवारी महिन्यात उच्चांक गाठू शकते, असा इशारा आयआयटीमधल्या अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

हा अंदाज कोरोना व्हेरिएंटसंदर्भातील अभ्यास करणारे आयआयटीमधील शास्त्रज्ञ मणिंद्र अग्रवाल यांनी वर्तवला आहे. पण ओमिक्रॉनमुळे येणारी ही तिसरी लाट दुसऱ्या लाटेपेक्षा सौम्य स्वरुपाची असेल, असा अंदाज अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे. अग्रवाल म्हणाले, आमचा सध्याचा ओमिक्रॉनच्या अनुषंगाने अंदाज असा आहे की देशात फेब्रुवारीपर्यंत तिसरी लाट दिसू शकते, परंतु ती दुसऱ्या लहरीपेक्षा सौम्य असेल. आतापर्यंत आपण पाहिले आहे की ओमिक्रॉनची तीव्रता डेल्टा व्हेरिएंट एवढी नाही.

जिथे ओमिक्रॉनचा उगम झाला, त्या दक्षिण आफ्रिकेतील बाधितांसंख्या तसेच संसर्गावर नीट लक्ष ठेवून त्याचा अभ्यास केला जाईल. दक्षिण आफ्रिकेत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत अद्यापही वाढ नोंदवण्यात आलेली नाही. ज्यावेळी रुग्णसंख्या आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्यांच्या संख्येविषयीची अधिक माहिती मिळेल, त्यावेळी अधिक ठामपणे निष्कर्ष काढता येईल, असेही अग्रवाल म्हणाले.

वेगाने नव्या व्हेरिएंटचा प्रसार होत असला, तरी त्याची तीव्रता डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे मागच्या दोन लाटांप्रमाणेच सौम्य लॉकडाउन, गर्दीवर निर्बंध, रात्रीची संचारबंदी अशा प्रकारचे उपाय करुन विषाणूसंसर्गाला उच्चांक गाठण्यापासून रोखता येईल, असेही अग्रवाल म्हणाले.