धक्कादायक; बंगळुरुमधील डॉक्टरला ओमिक्रॉनवर मात केल्यानंतर पुन्हा कोरोनाची लागण


बंगळुरु – कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूच्या संसर्गावर बंगळुरुमधील एका डॉक्टरने मात केल्यानंतर या डॉक्टरला पुन्हा कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. नुकताच भारतामध्ये ४६ वर्षीय डॉक्टर परदेशामधून दाखल झाला होता. या डॉक्टरचा भारतामधील पहिल्या दोन ओमिक्रॉनबाधित रुग्णांमध्ये समावेश आहे. या डॉक्टर व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेतून दुबई मार्गे भारतात आलेल्या डोंबिवलीमधील व्यक्तीला ओमिक्रॉनची लागण झाली होती.

ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेल्या डॉक्टरला पुन्हा कोरोनाची लागण झाल्याची बातमी खरी आहे. त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आला असल्याचे बृह्त बंगळुरु महानगर पालिकेने पीटीआयशी बोलताना सांगितले आहे. या डॉक्टरला सध्या विलगीकरणामध्ये ठेवण्यात आले आहे. या रुग्णामध्ये कोणतीही लक्षणे दिसत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

याबाबत कर्नाटकचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी दिलेल्या माहितीनुसार एका खासगी रुग्णालयामध्ये हे डॉक्टर काम करतात. २१ नोव्हेंबर रोजी ताप आणि डोकेदुखीचा त्रास होऊ लागल्यानंतर पुढच्या दिवशीच या डॉक्टरची कोरोना चाचणी सकारात्मक आली. त्यानंतर या डॉक्टरचे स्वॅब सॅम्पल जिनोम सिक्वेन्सींगला पाठवण्यात आले. सीटी व्हॅल्यू कमी आल्यामुळे व्हायरल लोड अधिक असल्याचे लक्षात आल्यामुळे जिनोम सिक्वेन्सींगचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

या डॉक्टरने कोरोना चाचणी सकारात्मक येण्याच्या एक दिवस आधीच एका आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्सला उपस्थिती लावली होती. ही कॉन्फरन्स १८ नोव्हेंबर आणि २० नोव्हेंबर रोजी होती. या कॉन्फरन्सला उपस्थित असणाऱ्या व्यक्तींचे कॉन्टॅक्ट स्ट्रेसिंगचे काम सध्या महानगरपालिका करत आहे. पण या व्यक्तीला ओमिक्रॉनचा संसर्ग कसा झाला हे ट्रेसिंगदरम्यान समजू शकलेले नाही.