वरळी बीबीडी चाळीतील सिलिंडर स्फोटाच्या घटनेवरून नितेश राणेंनी केली आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्या मागणी


मुंबई – भाजप आमदार नितेश राणे यांनी वरळी बीबीडी चाळीतील सिलिंडर स्फोटाच्या घटनेवरून आता आक्रमक भूमिका घेतली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी वरळी मतदारसंघाचे आमदार व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

यासंदर्भात ट्विट करत भाजप आमदार नितेश राणे म्हणाले, मुंबईकरांनो तुमच्या आयुष्याची काही किंमत राहिलेली नाही. वरळी बीडीडी चाळीत एक सिलिंडर स्फोट होतो. त्यानंतर संबंधिक कुटुंबाला पालिकेच्या नायर हॉस्पिटलमध्ये भरती केले जाते. तासनतास त्या कुटुंबला बघायला एकही डॉक्टर येत नाही आणि त्यामुळे चार महिन्याचे बाळ मृत्यूमुखी पडते. त्यानंतर त्याचे वडील देखीवल मृत्यूमुखी पडतात आणि आज त्याच्या आईला देखील आयुष्य गमावावे लागले आहे.


आता मुंबईत दोन विभिन्न चित्र आहेत. एका बाजूला याच मतदार संघाचे आमदार त्यांचे वडील, राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ते आजारी आहेत आणि त्यांना बरे करण्यासाठी मोठ्यातील मोठा डॉक्टर जगभरातून मुंबईत आणला जात आहे. ते लवकर बरे झाले पाहिजे अशी आमची इच्छा आहे. पण सामान्य मुंबईकरांसाठी अशा पद्धतीचा प्रयत्न का होत नाही? साधा महापालिकेचा डॉक्टर देखील त्यांना बघायला येत नाही आणि या सगळ्याचा जबाबदार उद्या डॉक्टरला धरल्यापेक्षा, संबंधित आमदार आहेत ते मुंबईचे पालकमंत्री आहेत. वर्षानुवर्षे महापालिकेत त्यांची सत्ता आहे. जर कारभार करायला त्यांना जमत नसेल, तर मंत्री आदित्य ठाकरेंनी थोडीही लाज असेल तर राजीनामा द्यावा, अशी मागणी मी करतो.

वरळी बीडीडी चाळीतील सिलिंडर स्फोटाच्या घटने लहान बाळ आणि त्याच्या वडिलांच्या पाठोपाठ आता त्या बाळाच्या आईचा देखील मृत्यू झाला आहे. त्यामुळे या कुटुंबातील पाच वर्षीय मुलगा अनाथ झाला. या स्फोटात या कुटुंबातील चौघे जण जखमी झाले होते. त्यांना वेळेत उपचार न मिळाल्यामुळे सर्वात अगोदर लहान बाळाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्या बाळाचे वडील आणि त्याची आई देखील दगावल्याने, या कुटुंबातील पाच वर्षीय मुलगा अनाथ झाला आहे. आता यावरून आता भाजप व शिवसेनेत राजकारण सुरू झाल्याचे दिसत आहे. या अनाथ झालेल्या मुलाला दत्तक घेण्याची घोषणा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. या बाळाचे पालनपोषण शिवसेना करेल, असे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.