पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या आंदोलन मागे घेण्याच्या आवाहनाला ‘मार्ड’चा सकारात्मक प्रतिसाद


मुंबई : राज्य शासन निवासी डॉक्टर्सच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील निवासी डॉक्टर्सनी आपले आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. त्यांच्या आवाहनाला मार्डच्या सदस्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन आंदोलन मागे घेण्याची ग्वाही दिली.

आपल्या विविध मागण्यांसाठी देशातील निवासी डॉक्टरांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील निवासी डॉक्टर्सच्या पदाधिकाऱ्यांसोबत पर्यावरण मंत्री ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत चर्चा केली. यावेळी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, मुंबईतील महापालिकेच्या महाविद्यालयांचे अधिष्ठाता, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि मार्डचे सदस्य उपस्थित होते.

पर्यावरण मंत्री ठाकरे म्हणाले, निवासी डॉक्टरांच्या विभागाशी निगडीत व महानगरपालिकेच्या अखत्यारीतील समस्या सोडविण्याबाबत शासन सकारात्मक आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारकडील विषयांबाबतही पाठपुरावा करण्यात येईल. आरोग्यसेवेसाठी ज्या आवश्यक बाबी आहेत त्या चांगल्या दर्जाच्या देण्याबाबत शासन आग्रही असल्याचेही ते म्हणाले. कोविडच्या पार्श्वभूमीवर मार्डने आंदोलन करू नये, असे आवाहन श्री ठाकरे यांनी यावेळी केले. राज्य शासनाने डॉक्टर्ससाठी चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल मार्डच्या सदस्यांनी समाधान व्यक्त करून समस्या सोडविण्यासाठी शासनाच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद देत आंदोलन मागे घेण्याची ग्वाही दिली.