ममता बॅनर्जींनी भर कार्यक्रमात पत्रकाराला आमच्या सरकारबद्दल चांगले लिहा, तरच जाहिराती मिळतील असे सांगितले!


कोलकाता – लोकशाहीचा माध्यमे हा चौथा स्तंभ असून या स्तंभावर सरकारच्या चुका दाखवण्याची महत्त्वाची जबाबदारी असते, असे मानले जाते. माध्यमांचे हेच स्वातंत्र्य अबाधित राहावे आणि जाहिरातदारांच्या प्रभावाखाली ते गमावले जाऊ नये, यासाठी सरकारकडून प्रकाशित केल्या जाणाऱ्या जाहिराती दैनिकांमध्ये छापल्या जातात, जेणेकरून त्यांना उत्पन्न मिळत राहावे आणि त्यांना जाहिरातदारांवर अवलंबून राहावे लागू नये. पण, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका पत्रकाराला सरकारकडून मिळणाऱ्या याच जाहिरातींसाठी सरकारबद्दल चांगले आणि सकारात्मक लिहिण्याची अटच घातली आहे. भर कार्यक्रमात ममता बॅनर्जी आणि या पत्रकारामधील संवादाचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

एका कार्यक्रमात ममता बॅनर्जी बोलत असताना एका स्थानिक वृत्तपत्राच्या महिला पत्रकाराने त्यांना वृत्तपत्राला सरकारी जाहिराती मिळत नसल्याची तक्रार बोलून दाखवली. गेल्या ११ वर्षांपासून आम्ही आमचे वर्तमानपत्र चालवत आहोत. पण आमच्यासोबत अनेक छोटी वर्तमानपत्र आज आर्थिक अडचणीत आहेत. सरकारकडून आम्हाला जाहिराती मिळत नाहीत. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा विनंती करते की तुम्ही या गोष्टीमध्ये लक्ष घालावे, अशी विनंती या महिला पत्रकाराने ममता बॅनर्जींना केली.


दरम्यान, या प्रश्नावर ममता बॅनर्जी यांनी संबंधित महिला पत्रकाराला दिलेल्या उत्तराने सर्वच जण बुचकळ्यात पडले. सरकारच्या कामांविषयी ग्रामीण भागातील जी वृत्तपत्र चांगले लिहितील, त्यांना जाहिरातीतून नफा मिळेल. यासंदर्भात मी जिल्हाधिकाऱ्यांना विशेषकरून सूचना देईन. कारण सरकार प्रत्येक वेळी प्रसिद्धीसाठी राज्य सरकारच्या संसाधनांचा वापर करत नसल्याचे ममता बॅनर्जी म्हणाल्या.

सरकारच्या उपक्रमांविषयी केलेल्या कव्हरेजच्या कॉपी वृत्तपत्रांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्याबाबत देखील ममता बॅनर्जींनी स्थानिक वृत्तपत्रांना बजावले आहे. विकासाच्या दृष्टीने आम्ही अनेक उपक्रम करत असतो. मोठ्या टीव्ही चॅनल्सवर फक्त एकदाच ही बातमी दाखवली जाते. अशा उपक्रमांविषयी चांगले लिहिणाऱ्या वृत्तपत्रांची आम्हाला काळजी घ्यावीच लागते. त्यामुळे तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून तुमच्या कव्हरेजची कॉपी त्यांना पाठवा, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.

दरम्यान, त्यांनी तात्काळ वर्तमानपत्रातील कव्हरेजच्या कॉपी जिल्हाधिकाऱ्यांना का पाठवायच्या, याविषयी देखील खुलासा केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना बातम्यांच्या कॉपी दिल्यामुळे त्यांना हे पाहाता येईल की सरकारबद्दलचे कव्हरेज सकारात्मक आहे की नकारात्मक. जे कुणी सकारात्मक कव्हरेज जास्त करत असेल, त्यांना जाहिराती मिळतील. त्यांनी चांगले काम करावे आणि सर्व सकारात्मक बाबींवर भर द्यावा असे मला वाटते, असे ममता बॅनर्जी यावेळी म्हणाल्या.