उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी भाजपच्या घोषवाक्यावरुन जावेद अख्तरांचा टोला


मुंबई – उत्तर प्रदेश भाजपला गीतकार जावेद अख्तर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून टोला लगावला आहे. उत्तर प्रदेश भाजपच्या घोषणेमध्ये हिंदीसह उर्दूच्या शब्दाच्या वापरावरून जावेद अख्तर यांनी टोला लगावला. जावेद अख्तर यांचे हे ट्विट चांगलेच व्हायरल होत असून त्यावर यूजर्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

पुढील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश भाजपने ऑनलाइन प्रचार सुरू केला होता. योगी आदित्यनाथ सरकारचे यश सांगणाऱ्या या मोहिमेचे घोषवाक्य ‘सोच ईमानदार काम दमदार’असे आहे. याच घोषणेवरून टोला लगावत जावेद अख्तर यांनी भाजपची खिल्ली उडवली आहे.


आपल्या ट्विटमध्ये जावेद अख्तर यांनी लिहिले की, उत्तर प्रदेश भाजपचे हे घोषवाक्य पाहून आनंद झाला, ‘सोच ईमानदार काम दमदार’ या चार शब्दांच्या घोषवाक्यात तीन उर्दू शब्द आहेत. ईमानदार, काम आणि दमदार हे शब्द उर्दू असल्याचे जावेद अख्तर म्हणाले.

दरम्यान, यूजर्सच्या जावेद अख्तर यांच्या या ट्विटवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी लिहिले की, ‘हिंदीप्रमाणे उर्दू देखील भारताची आहे. तर, काहींनी म्हटले की, सरकार हिंदी आणि उर्दूमध्ये फरक करत नाही, परंतु काही लोक दोन्ही भाषांना विभाजित करतात.