देशातील 23 जणांना कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण


नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमिक्रॉनचा शिरकाव झाला असून 2 डिसेंबर रोजी देशात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला होता. देशात सध्या ओमिक्रॉनचे 23 रुग्ण सापडले आहेत. म्हणजेच, 5 दिवसांत 10 पटींनी वाढ झाली आहे. दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या ओमिक्रॉनने केवळ 5 दिवसांतच देशातील 5 राज्यांत शिरकाव केला आहे. महाराष्ट्रात 10, राजस्थानमध्ये 9, कर्नाटकात 2, दिल्ली आणि गुजरातमध्ये प्रत्येक 1-1 रुग्ण आढळून आला आहे.

ओमिक्रॉनचे दोन रुग्ण देशात सर्वात आधी कर्नाटकात आढळून आले होते. त्यानंतर ओमिक्रॉन गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली आणि राजस्थानपर्यंत पोहोचला. राजस्थानच्या जयपूरमध्ये 9 रुग्ण आढळले. चिंतेची बाब म्हणजे, राजस्थानमध्ये आढळून आलेले ओमिक्रॉनचे रुग्ण एकाच कुटुंबातील आहेत. दक्षिण अफ्रिकेमधून राज्यस्थानमध्ये आलेल्या कुटुंबाच्या जनुकीय अनुक्रम (जीनोम सिक्वेन्सिंग) तपासात नऊ जणांना ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झाल्याचे समोर आले. याबाबत माहिती देताना आरोग्य सचिव वैभव गालरिया म्हणाले की, दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या कुटुंबाला आणि त्यांच्या संपर्कातील ओमिक्रॉनबाधितांना उपचारासाठी आरयूएचएसमध्ये दाखल करण्यात आले आहे. या रुग्णांमध्ये सध्या सौम्य लक्षणे जाणवत आहेत.

ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण राजस्थानसोबतच महाराष्ट्रात आहेत. येथे आतापर्यंत 10 जणांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. महाराष्ट्रात 4 डिसेंबर रोजी ओमिक्रॉनचा शिरकाव झाला होता. सध्या मुंबईत 02, पुण्यात 01, पिंपरी-चिंचवडमध्ये 06 आणि डोंबिवलीत 01 ओमिक्रॉनचा रुग्ण आढळून आला आहे.