या अभिनेत्रींनी केले वयाने छोट्या जोडीदाराबरोबर लग्न
जगातील अनेक देशात तसेच भारतात विवाह करताना मुलगा मुलीपेक्षा वयाने मोठा असावा असा संकेत आहे. आजही अनेक विवाह याच निकषावर होतात. मात्र आता जग वेगाने बदलते आहे आणि ही परंपरा थोडी मागे पडत असल्याचे दिसून येत आहे. बॉलीवूड याला अपवाद नाहीच उलट जगाच्या चार पावले पुढेच असल्याचे दिसून येत आहे. बॉलीवूड अभिनेत्री कतरिना आणि अभिनेता विक्की कौशल विवाह वेदीवर चढण्यासाठी आता अगदी तयारीत आहेत. कतरिना ३८ वर्षांची आहे तर विक्की तिच्यापेक्षा पाच वर्षाने लहान म्हणजे ३३ वर्षांचा आहे.
बॉलीवूड मध्ये असे विवाह फार पूर्वी सुद्धा झाले आहेत. जेष्ठ अभिनेते सुनील दत्त यांनी अभिनेत्री नर्गिसबरोबर विवाह केला होता तो ६० च्या दशकात. तेव्हा सुद्धा नर्गिस सुनील दत्त यांच्यापेक्षा वयाने १ वर्ष मोठी होती शिवाय हा आंतरधर्मीय विवाह होता. बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री प्रियांका चोप्रा पती निक जोनास पेक्षा तब्बल १० वर्षाने मोठी आहे आणि त्यांचे वैवाहिक जीवन सुखात सुरु आहे.
९० च्या दशकात उर्मिला मातोंडकर हिने तिच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान असलेला उद्योजक मोहसीन यांच्याबरोबर विवाह केला. मोहसीन सुद्धा अभिनेता आणि मॉडेल म्हणून चमकलेला आहे. जगतसुंदरी आणि बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या राय पती अभिषेक बच्चन यांच्यापेक्षा तीन वर्षांनी मोठी आहे. तर बिपाशा बसू तिचा नवरा कारण पेक्षा चार वर्षे मोठी आहे.
२०१५ मध्ये सोहा अली खान हिने तिच्यापेक्षा पाच वर्षांनी लहान असलेल्या कुणाल खेमू सोबत विवाह केला आहे. नेहा धुपिया पती अंगद पेक्षा दोन वर्षे मोठी आहे. त्यांचा विवाह २०१८ मध्ये झाला आहे. सारा अली खानची आई अभिनेत्री अमृता सिंग पती सैफ अली खान यांच्यापेक्षा १२ वर्षांनी मोठी होती मात्र हा विवाह टिकला नाही.