मश्रूमपासून बनले लेदर, वेगन लोंकाना मिळाला नवा पर्याय

वेगन समुदायासाठी एक चांगली बातमी संशोधकांनी दिली आहे. त्यांनी चामड्याइतकेच आकर्षक आणि उबदार फॅब्रिक तयार केले आहे. हे फॅब्रिक चक्क मशरुम्स किंवा अळंबी पासून तयार केले गेले आहे. लेदर प्रमाणेच आकर्षक आणि उत्तम फिनिशचे हे फॅब्रिक्स पर्सेस, जॅकेटस बनविण्यासाठी वापरले जात आहे. काही ठिकाणी प्रदर्शनात ते पेश केले गेले आहे.

थंडीचे दिवस सुरु झाले आहेत. लोकरीपासून बनलेले कपडे थंडीमध्ये उब देत असले तरी आजकाल ट्रेंड मध्ये आहेत ते लेदरचे कपडे. लेदर किंवा चामड्यापासून बनलेल्या पँटस, जॅकेटस सुद्धा उबदार असतात शिवाय दिसायला आकर्षक आणि सुंदर. त्यामुळे सर्वानाच हवीहवीशी वाटतात. पण आजकाल वेगन म्हणजे प्राण्यांपासून बनलेली कुठलीच वस्तू न वापरणे याचे फॅड आले आहे. अनेक बडे सेलेब्रिटी स्वतःला वेगन म्हणवून घेत आहेत. यात प्राण्याचे दुध, मांस जसे निषिद्ध आहे तसेच प्राण्याचे कातडे वापरून केलेल्या वस्तू सुद्धा निषिद्ध आहेत. परिणामी या लोकांची लेदर वापरताना जी अडचण होत होती त्याला आता पर्याय मिळाला आहे.

मश्रूमपासून बनविलेले हे फॅब्रिक एक प्रकारचे नकली लेदर म्हणता येईल. पण ते चांगल्या उद्देशाने बनविले गेले आहे. सॅनफ्रान्सिस्कोच्या बायोमटेरीयल कंपनी मायक्रोवर्क्सने ते बनविले आहे. डेली मेलच्या बातमीनुसार हे मटेरियल बायोडीग्रेडेबल, इको फ्रेंडली आहे. हे मश्रूम किंवा फंगस छोट्या ट्रे मध्ये सुद्धा वाढविता येते. या फॅब्रिकला ‘रिशी’ असे नाव दिले गेले आहे. मश्रूमपासून फॅब्रिक बनविण्याच्या या तंत्रज्ञानाला फाईन मायसीलीयम टेक्निक असे म्हटले जाते. याचे पेटंट कंपनीने घेतले आहे. या फॅब्रिक पासून आणि लेदरपासून बनविलेल्या कपड्यात फरक करणे अवघड आहे.

कंपनीचे सीईओ डॉ.मॅट स्कुलीन यांच्या म्हणण्यानुसार हा चामड्याला चांगला पर्याय आहे. यामुळे प्राणी दया भावना जोपासूनही लेदर कपडे वापरल्याचा आनंद घेता येणार आहे. यापासून अनेक वस्तू बनविता येतात. प्राण्यांच्या लेदरपासून वस्तू बनविताना ग्रीन हाउस गॅस तयार होतात तो धोका यात नाही. त्यामुळे हे पर्यावरण पूरक आहे.