गुरु राहुल द्रविडच्या पावलावर टीम इंडियाचे पाऊल

मुंबईच्या वानखेडे स्टेडीयमवर न्यूझीलंड विरुद्ध तीन कसोटी मालिकेतील अखेरची कसोटी आणि सिरीज जिंकलेल्या टीम इंडियाने नवे कोच राहुल द्रविड यांच्या पावलावर पाउल टाकले आहे. टीम इंडियाने ही कसोटी जिंकल्यावर वानखेडे स्टेडीयमचे पीच क्युरेटर व ग्राउंडमन यांना चांगले पीच तयार केले म्हणून ३५ हजार रुपयांचे बक्षीस दिले देऊन द्रविड यांनी सुरु केलेली प्रथा पुढे नेली आहे.

कानपूर मधली कसोटी पाच दिवस चालली होती आणि अखेर ती अनिर्णीत राहिली होती. निष्पक्ष खेळाचे नेहमीच समर्थन करणाऱ्या, टीम इंडियाच्या कोच पदी नव्याने आलेल्या राहुल द्रविड यांनी त्यावेळी स्वतःच्या खिशातून कानपूर पीच तयार करणारे क्युरेटर आणि ग्राउंडमन यांना ३५ हजाराचे बक्षीस देऊन त्यांचा सन्मान केला होता. तीच परंपरा टीम इंडियाने वानखेडे स्टेडीयमवर सुरु ठेवली. ही कसोटी चार दिवस चालली.

वानखेडे स्टेडीयम टीम इंडियासाठी रेकॉर्डतोड स्टेडीयम ठरले आहे. आयसीसीच्या टेस्ट रँकिंग मध्ये टीम इंडिया नंबर वन टीम ठरली आहे. भारतात टीम इंडिया सलग १४ वी मालिका जिंकली असून टेस्ट मध्ये सर्वात मोठा विजय टीम इंडियाने मिळविला आहे. त्यांनी न्यूझीलंडचा ३७२ धावांनी पराभव केला. विराट कप्तान असताना त्याचा हा ३९ वा विजय आहे तर टीम इंडियाचा वानखेडेवर हा सलग तिसरा विजय आहे. याच कसोटी मध्ये अश्विन ३०० विकेट घेणारा भारताचा दुसरा गोलंदाज ठरला आहे तर द्रविड आणि विराट कोहली एकत्र अशी ही पहिलीच मालिका आहे.