कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या नव्या पार्टी कार्यालयाचे उदघाटन

पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसला सोडचिट्ठी दिलेले कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी नव्या पक्षाची स्थापना केली असून या नव्या पक्षाचे म्हणजे पंजाब लोक कॉंग्रेसचे पहिले कार्यालय चंदिगढ येथे सुरु करण्यात आले आहे. यामुळे पंजाब राज्यातील वातावरण तापले असून अमरिंदरसिंग यांनी ते राजकारणात अधिक सक्रीय होत असल्याचे संकेत यातून दिले आहेत असे मानले जात आहे.

अमरिंदरसिंग आजच भाजपचे पंजाब प्रभारी राजेंद्र शेखावत यांची भेट घेत आहेत. अमरिंदर यांनी २०२२ च्या विधानसभा निवडणुकात भाजपबरोबर जाण्याचे संकेत अगोदरच दिले आहेत. शेखावत यांच्या भेटीत जागा वाटपाबद्दल चर्चा होईल असा अंदाज आहे. अमरिंदर भाजप अध्यक्ष जे पी नडडा यांचीही भेट घेणार आहेत तसेच गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट चार दिवसात घेणार आहेत.

आपल्या पक्ष कार्यालयाच्या उदघाटनाचा व्हिडीओ अमरिंदर यांनी ट्वीटवर वर शेअर केला आहे. त्यात ते म्हणतात, ‘वाहे गुरूंचा आशीर्वाद घेतला आहे. पंजाबच्या समृद्धी आणि सुरक्षेसाठी ईश्वराला प्रार्थना करतो आहे. राज्यातील जनतेसाठी कल्याण कार्य करण्याचे काम सुरूच राहणार आहे.’

नवज्योतसिंग सिद्धूच्या हाती कॉंग्रेसने पंजाबची सूत्रे दिल्यानंतर अमरिंदरसिंग यांनी कॉंग्रेसचा राजीनामा दिला होता.