आमची सेफ बोट आहे, येथून सुटते आणि थेट दिल्लीला पोहोचते – नारायण राणे


पुणे – ठाकरे सरकारला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शेलक्या शब्दात सुनावले आहे. महाविकास आघाडी टायटॅनिक बोट आहे, तर भाजप सेफ बोट असल्याची खोचक टीका नारायण राणे यांनी केली आहे. तसेच त्यांच्या बोटीत कोणी चढणार नाही आणि आमच्या बोटीला काही होणार नसल्याचेही राणे म्हणाले.

नारायण राणे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पुण्यातील सिम्बायोसिस संस्थेच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकाला भेट दिली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी राणे म्हणाले, आमच्यातून जाण्याचा कोणी प्रयत्न करणार नाही. टायटॅनिकच्या बोटीत कोणी बसणार नाही. आमची सेफ बोट आहे. येथून सुटते आणि थेट दिल्लीला पोहोचते. शिवसेनेचे काही खरे नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तिघांची टायटॅनिक बोट आहे. प्रत्येकजण आपल्या बाजूने खेचत असतो.

आज बाबरी मशीद बलिदान दिवस असल्याचे ट्विट मिलिंद नार्वेकर यांनी केले होते. याबद्दल पुण्यातील महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. नारायण राणेही त्यावेळी जवळच उभे होते. या ट्विटबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, नार्वेकरांचे बरोबरच आहे. त्यात चुकीचे काय? एवढ्यात नारायण राणे म्हणाले, नार्वेकर म्हणजे नवे शिवसेनाप्रमुख का? असे म्हणताच त्यावर पुढे काहीही न बोलता राणे निघून गेले.