हा भारत माझ्या गांधींचा नव्हे तर नथुराम गोडसेंचा – मेहबुबा मुफ्ती


नवी दिल्ली – काश्मीरची सद्यस्थिती सर्वांसमोर ठेवण्यासाठी दिल्ली दाखल झालेल्या पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी हा माझ्या गांधींचा भारत नव्हे, तर नथुराम गोडसेचा भारत वाटत असून गोडसेचे काश्मीर बनवण्याचा कट रचला जात आहे. येथे लोकांना बोलण्याचे स्वातंत्र्यही नसल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. सोमवारी दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या एका आंदोलनादरम्यान त्या बोलत होत्या.

केंद्र सरकारवर टीका करत मुफ्ती यांनी काही गंभीर आरोपही केले आहेत. त्या म्हणाल्या, भारताच्या जनतेसमोर जम्मू काश्मीरमधील परिस्थिती शांततापूर्ण असल्याचा बनाव केंद्र सरकार करत आहे. पण प्रत्यक्षात येथे रस्त्यावर रक्ताचे पाट वाहत आहेत, दहशतवादी विरोधी कायदा छोट्या छोट्या गोष्टींवरुन लोकांवर थोपला जात आहे. ज्या ‘नया काश्मीर’चा प्रचार देशाच्या जनतेसमोर केला जात आहे, ते खरे नाही. दिवसाढवळ्या एका काश्मिरी पंडिताची हत्या केली जाते, १८ महिने झाले, एक मुलगी सैन्याच्या हातून मारल्या गेलेल्या आपल्या वडिलांचं प्रेत ताब्यात मिळवण्यासाठी आंदोलन करत आहे. काश्मीरमध्ये एका बिहारी व्यक्तीला ठार मारण्यात येते.

मुफ्ती केंद्र सरकारवर निशाणा साधताना म्हणाल्या, हा नवा भारत आहे, पण संविधानाबद्दल बोलणाऱ्या प्रत्येकाला येथे ‘तुकडे तुकडे गँग’चा सदस्य म्हणून हिणवले जाते. कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत असलेल्या शेतकऱ्यांना खलिस्तानी संबोधले जाते आणि त्यांच्यावर यूएपीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जातो. काश्मीरची परिस्थिती जो देशाच्या जनतेपुढे मांडू पाहतो, त्याला पाकिस्तानी म्हटले जाते.

जेव्हा मुफ्ती यांना कलम ३७० हटवण्याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी उत्तर दिले की काश्मिरी जनतेला कलम ३७० च्या नावाखाली लुटले गेले, फसवले गेले. भारतात अनेक अशी राज्य आहेत, जिथे बाहेरील राज्यातील लोकांना जमिनी विकत घेण्यासाठी बंदी आहे. मग जर केंद्र सरकारला त्या राज्यांबद्दल काही अडचणी नाहीत, तर मग काश्मीरच्या बाबतीतच का आक्षेप? केंद्र सरकारने लवकरात लवकर जम्मू काश्मीरमधील जनतेशी संवाद साधण्याची गरज आहे.