ओमिक्रॉनच्या संकटामुळे एक डिसेंबरपासून सुरु झालेल्या शाळांवर पुन्हा एकदा गदा येण्याची शक्यता


मुंबई – ओमिक्रॉनच्या राज्यातील वाढत्या पार्श्वभूमीवर काही नियम कठोर करण्यात आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा नुकत्याच काही भागात सुरु झाल्या. पण ओमिक्रॉनच्या संकटामुळे आता एक डिसेंबरपासून सुरु झालेल्या शाळांवर पुन्हा एकदा गदा येण्याची शक्यता निर्माण झाली असून पुन्हा शाळा बंद होण्यासंदर्भात संकेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुंबई महापालिका प्रशासनाने दिले आहेत. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आढावा घेऊन शाळांबाबत 4 ते 5 दिवसांत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मिळत आहे.

लहान मुलांच्या लसीकरणाची राज्याच्या शालेय शिक्षण विभागालाही प्रतीक्षा आहे. लहान मुलांचे लसीकरण सुरू व्हावे, अशी अपेक्षा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली आहे. शाळांबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर निरीक्षण करून घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे की, शाळांबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर निरीक्षण करुन घेतला जाईल. मुंबई, पुण्यात 15 डिसेंबर पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर याठिकाणच्या प्रशासनाकडून परिस्थितीचे निरीक्षण केले जात आहे. कोरोना टास्क फोर्ससोबत चर्चा करुन शाळांची नियमावली बनवली आहे. येथुन पुढेही स्थानिक प्रशासकीय यंत्रणेकडून परिस्थितीचा आढावा घेऊन गरज पडल्यास पुढील निर्णय घेतले जातील, असे गायकवाड यांनी म्हटले आहे.

शालेय शिक्षण विभागाकडे लहान मुलांच्या लसीकरणाबाबत अद्याप कोणतीही माहिती आलेली नाही. पण, आमच्यासाठी लहान मुलांचे आरोग्य, सुरक्षा ही प्राथमिकता असल्यामुळे लहान मुलांचे लसीकरण सुरु व्हावे अशी आमची अपेक्षा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शाळांबाबत अजुनही निर्णय घेतलेला नसल्यामुळे वाट पाहावी लागेल. आपण तिसऱ्या लाटेलाही थोपवू, असे म्हटले आहे.