सर्वोच्च न्यायालयाकडून परमबीर सिंह यांना तुर्तास दिलासा, पोलिसांना कुठलीही चार्जशीट दाखल न करण्याचे आदेश


नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांना तुर्तास दिलासा दिला आहे. सध्यातरी कुठलीही चार्जशीट परमबीर यांच्याविरोधात दाखल न करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. आता 11 जानेवारीपर्यंत या प्रकरणाची पुढील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने परमबीर यांना अटक न करण्याबाबत दिलेली मुदत आज संपत होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात परमबीर यांनी दाखल याचिकेवर सुनावणी आज पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाकडून परमबीर सिंह यांनी तुर्तास दिलासा मिळाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांवर 100 कोटी वसुलीचे आरोप प्रकरणी परमबीर सिंह यांना अटक न करण्याचे आदेश या आधीच्या सुनावणीत दिले होते. आज अटक न करण्याची मुदत संपत असल्यामुळे या प्रकरणी पुन्हा सुनावणी पार पडली. ज्यामध्ये परमबीर सिंह यांनी काहीसा दिलासा मिळाला आहे. परमबीर सिंह यांना न्यायालयाने तुर्तास अटकेपासून संरक्षण देत तपासात सहभागी होण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयात सीबीआयने म्हटले आहे की, परमबीर सिंहवर नोंदवलेले महाराष्ट्र सरकारने सर्व खटले सीबीआयकडे वर्ग केल्यास आमची हरकत नाही. न्यायालयाने त्यावर सीबीआयला एका आठवड्यात लेखी प्रतिज्ञापत्र देण्यास सांगितले आहे. इतर पक्षकारांना सीबीआयच्या प्रतिज्ञापत्रावर उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी 11 जानेवारीला होणार आहे.