ईअर एन्डिंगच्या नियमावलीसाठी राज्य सरकारचे वेट ॲण्ड वॉच


मुंबई – अनेक लोक 2021 वर्षाच्या अखेरीस घराबाहेर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बाहेर पडतात. त्यात 25 ते 31 डिसेंबरला पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटनासाठी जातात. पण अशाने पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढू शकते. तसेच पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढले, तर त्यामुळे प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्यामुळे ठाकरे सरकार या काही दिवसात निर्बंध कठोर करणार का? हे आगामी काळातच स्पष्ट होईल.

राज्य शासनाने आणि स्थानिक प्रशासनाने घातलेले निर्बंधाचे काटेकोर पालन केले, तर पर्यटन सुरु राहिल. वर्षाअखेरीस राज्यात पर्यटन मोठ्या प्रमाणात होत असते. राज्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रित आहे. पर्यटकांनी निर्बंध पाळले, तर कुठेही अडचण येणार नसल्याचे पर्यटन विभागाचे संचालक मिलिंद बोरिकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा अंदाज घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील काही बाबींवरील निर्बंध कठोर केले जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून पुढील आठ दिवसांत त्यावर निर्णय होईल, असे स्पष्ट केले आहे.

राज्यभरात सध्या ओमिक्रॉनचा धोका वाढत आहे, त्याचे गुणधर्म समजून घेऊन आगामी आठ-दहा दिवसांत निर्बंधांबाबत ठोस निर्णय घेतला जाईल, असे स्पष्टीकरण देखील टोपे यांनी दिले आहे.त्यानुसार आता येत्या कॅबिनेट बैठकीत आघाडी सरकार राज्यात नवीन नियम बनवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

ओमिक्रॉनची परदेशातून आलेल्या ज्या प्रवाशांना लागण झाली आहे. त्यांच्या घरातील लहान मुलांनाही संसर्ग झाला आहे. त्यामुळेच केंद्र सरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेने त्याबद्दलची स्पष्ट भूमिका मांडण्याची गरज आहे. मागील दोन-तीन दिवसांमध्ये राज्यातील काही राजकीय लोकांच्या घरात विवाह सोहळे पार पडले. या सोहळ्यांमध्ये मोठी गर्दी जमली होती. हा ओमिक्रॉनचा विषाणू फार वेगाने पसरत असल्याचे सांगितले जात आहे. म्हणूनच देशपातळीवरुन सर्व राज्य, नागरिकांना यासंबंधीचे चित्र स्पष्ट करणे गरजेचे आहे. ओमिक्रॉनबद्दल देशपातळीवर निर्णय झाल्यास सर्व राज्यही त्यांच्या पातळीवर पुढील पावले उचलतील, असं अजित पवारांनी म्हटले आहे.

कोरोनाच्या नवीन ओमिक्रॉन व्हेरिएंटने सर्वांचीच चिंता वाढवली आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचे आठ रुग्ण राज्यातही आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागही अलर्ट झाला आहे. अशातच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यातील ओमिक्रॉन परिस्थिती संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यातच सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्स यांच्यामध्ये ओमिक्रॉन संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडणार असल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली आहे. आज रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्स यांच्यात होणाऱ्या बैठकीत ओमिक्रॉन आणि प्रतिबंधात्मक मार्गदर्शक तत्त्वांवर चर्चा केली जाईल, असे आदित्य ठाकरेंनी सांगितले आहे.