धक्कादायक माहिती; ओमिक्रॉनचा क्वारंटाईन कालावधीत वेगवेगळ्या रुममध्ये असतानाही संसर्ग


हाँगकाँग – कोरोनानंतर जगावर भीतीचे सावट निर्माण करणाऱ्या नव्या व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर आली असून यामुळे चिंतेत अजून भर पडली आहे. हाँगकाँगमधील एका हॉटेलमध्ये क्वारंटाईन असतानाही ओमिक्रॉनची लागण झाल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलेल्या हॉटेलमध्ये एकमेकांपासून दूर अंतरावर असतानाही दोघांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे समोर आले आहे.

यासंदर्भात Emerging Infectious Diseases या विज्ञान विषयक जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, दोन्ही प्रवाशांचे लसीकरण झाले आहे. यामुळेच दोन्ही प्रवाशांना लागण झाल्याने ओमिक्रॉनचा वेगाने होणारा संसर्ग आरोग्य तज्ज्ञांची चिंता वाढवत आहे. हाँगकाँगमधील हॉटेलमध्ये क्वारंटाइनमध्ये राहणाऱ्या पूर्ण लसीकरण झालेल्या तसेच कोणतीही लक्षणे नसलेल्या प्रवाशाला ओमिक्रॉनची लागण झाली आहे. यासोबतच त्याच हॉटेलमध्ये दुसऱ्या एका रुममध्ये राहत असलेल्या पूर्ण लसीकरण झालेल्या आणखी एका प्रवाशाला लागण झाली असून कठोर विलगीकरणात ठेवण्यात आल्यानंतरही संसर्ग होत असल्याचे सिद्ध होत आहे, असे या अभ्यासात सांगण्यात आले आहे.

अभ्यासात देण्यात आलेल्या माहितीनुसार, १३ नोव्हेंबर २०२१ ला रुग्णाने आपला पॉझिटिव्ह रिपोर्ट दिला होता. कोणतीही लक्षणे नसणाऱ्या या रुग्णाला नंतर रुग्णालयात आणि विलगीकरणात ठेवण्यात आले. तर दुसऱ्या रुग्णाला १७ नोव्हेंबरला थोडीशी लक्षणे जाणवू लागली. त्याचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे. सीसीटीव्ही तपासण्यात आले असता दोन्ही रुग्ण आपल्या रुममधून अजिबात बाहेर आले नव्हते, तसेच एकमेकांना भेटलेही नसल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे जेवणासाठी किंवा कोरोना चाचणीसाठी दरवाजा उघडला असता हवेच्या माध्यमातून हा संसर्ग झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. पण हे दोन्ही रुग्ण एक दिवसाच्या अंतराने आल्यामुळे एका दिवशी चाचणी होण्याचा प्रश्न नव्हता. त्यामुळे हवेच्या माध्यमातूनच हा संसर्ग झाल्याची सर्वात जास्त शक्यता असल्याचे अभ्यासात सांगण्यात आले आहे.