अॅस्ट्राझेनकाची लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या तयार का होतात, शास्त्रज्ञांचे स्पष्टीकरण


ब्रिटन – ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनकाची लस कोरोनाच्या महामारीला अटकाव करण्यासाठी प्रभावी ठरली. पण, लशीचा वापर केल्यानंतर त्याचे काही दुष्परिणामही समोर येऊ लागले होते. यामध्ये लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या तयार होत असल्याच्या तक्रारीही समोर आली होती. या तक्रारीनंतर काही देशांनी लशीचा वापर थांबवला होता. लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या तयार का होतात? याबाबत शास्त्रज्ञांनी संशोधन केले असून त्याचे निष्कर्ष समोर आले आहेत.

याबाबत ब्रिटनमधील कार्डिफ विद्यापीठातील आणि अमेरिकेतील संशोधकांच्या पथकाने संशोधन केले आहे. रक्तातील प्रथिने लशीच्या मुख्य घटकांकडे कशी ओढले जातात, याबाबत त्यांनी काही मुद्दे मांडले आहेत. अॅस्ट्राझेनकाची लस घेतल्यानंतर एक साखळी प्रक्रिया सुरू होते. यामध्ये रोगप्रतिकारक शक्तीचाही समावेश असतो. या प्रक्रियेतून रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ शकतात, असे संशोधकांनी म्हटले आहे. याबाबतचे एक वृत्त ‘बीबीसी’ने प्रसिद्ध केले आहे.

जगामधील लक्षावधी लोकांचे अॅस्ट्राझेनकाच्या लशीमुळे कोरोनापासून संरक्षण झाले आहे. ही लस भारतात सिरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केली असून ‘कोविशिल्ड’ या नावाने दिली जाते. लशीमुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होत असल्याचे समोर आल्यानंतर भारतातही चिंता व्यक्त केली जात होती. एकूण जगभरात अॅस्ट्राझेनकाची लस घेतलेल्यांच्या संख्येच्या तुलनते रक्ताची गुठळ्या तयार झाल्याच्या प्रकरणांची संख्या अतिशय नगण्य आहे.

रक्ताच्या गुठळ्या लस घेतल्यानंतर का तयार होतात, याचे कारण जाणून घेण्यासाठी 40 वर्षाखालील व्यक्तींना लस कशा प्रकारे दिली जाते ही बाबदेखील लक्षात घेण्यात आली. ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनकाची लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या तयार का होतात, हे दुष्परिणाम थांबवता येऊ शकतात का, याबाबत संशोधन करण्यात आले. कार्डिफमधील संशोधकांना ब्रिटन सरकारने आपात्कालीन निधीदेखील पुरवला. काही प्राथमिक निष्कर्ष या संशोधकांनी जाहीर केल्यानंतर अॅस्ट्राझेनकाचे शास्त्रज्ञ देखील या संशोधनात सहभागी झाले होते. लसीपेक्षा कोरोना संसर्गामुळे गुठळ्या होण्याची शक्यता जास्त असते आणि ते का होतात याचे संपूर्ण स्पष्टीकरण अद्याप समोर आले नसल्याचे अॅस्ट्राझेनकाच्या प्रवक्त्यांनी म्हटले.

स्नायूमध्ये ही लस टोचली जाते. पण, लस काही वेळेस रक्तप्रवाहात जाते. तेथे लस ही रक्तातील पेशी (प्लेटलेट) फॅक्टर 4 मध्ये प्रथिनांना आकर्षित करू शकते.प्लेटलेट फॅक्टर 4 आणि विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी रोगप्रतिकारक प्रणाली ही सोडण्यात येणाऱ्या अॅन्टीबॉडीमध्ये गोंधळात पडते. त्यातून अॅन्टीबॉडी आणि प्लेटलेट फॅक्टर 4 हे एकत्र होतात आणि रक्ताच्या गुठळ्या तयार होतात, असे शास्त्रज्ञांनी म्हटले.

विज्ञान विषयक नियतकालिक Science Advances मध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे. या संशोधनानुसार लशीतील एडिनोव्हायरस ही प्लेटलेट 4 प्रथिनांना एखाद्या चुंबकासारखे आकर्षित करते. कार्डिफ विद्यापीठातील संशोधक प्रा. अॅलन पार्कर यांनी ‘बीबीसी’ला सांगितले की, एडिनोव्हायरसचा पृष्ठभाग अत्यंत नकारात्मक आहे आणि प्लेटलेट फॅक्टर चार अत्यंत सकारात्मक आहे आणि या दोन गोष्टी अगदी चांगल्या प्रकारे जुळतात. या संशोधनात आणखी काही टप्पे गाठायचे आहेत, असेही त्यांनी सांगितले.