कोरोना लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञाचा ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ‘हा’ गंभीर इशारा


ब्रिटन – कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या संसर्गामुळे सध्या जगभरात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट येणार का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. अगदी भारतात आणि महाराष्ट्रातही ओमिक्रॉनचा हा संसर्ग येऊन पोहचला आहे. ऑक्सफर्ड-एस्ट्रोजेनेका कोरोना लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञ डेम सारा गिल्बर्ट यांनी याच पार्श्वभूमीवर आगामी काळात जीवघेणी साथ येणार असल्याचा गंभीर इशारा दिला आहे. ४४ व्या डिम्बलबी व्याख्यानात त्या बोलत होत्या. त्यांनी यावेळी अशा साथीरोगांच्या तयारीसाठी निधीची गरज असल्याचे सांगत निधी उपलब्ध झाला तरच हा प्रकोप थांबवता येईल, असेही नमूद केले.

नव्या कोरोना विषाणूमुळे कोरोना विरोधी लसीची परिणामकारकता कमी होऊ शकते, असेही डेम सारा गिल्बर्ट यांनी सांगितले. गिल्बर्ट म्हणाल्या, कोरोनाच्या नव्या विषाणूबाबत जोपर्यंत अधिक माहिती समोर येत नाही, तोपर्यंत नागरिकांनी सावधगिरीने वागले पाहिजे. आपल्या उपजीविकेला आणि जीवालाच एखाद्या विषाणूमुळे धोका निर्माण होण्याची ही काही पहिली वेळ नाही. खरंतर हे आहे की आगामी काळात येणारा साथीरोग यापेक्षाही वाईट असेल. हा आजार अधिक संसर्गजन्य आणि घातक असेल.

आपण या साथीरोगाच्या वेळी जे पाहिले ते आगामी काळात पुन्हा पाहायला लागण्याच्या स्थितीत आपण जाऊ शकत नाही. कोरोनामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे आपल्याकडे साथीरोगांचा सामना करण्यासाठी पैसे नाहीत. आपण कोरोनातून जे शिकलो आहे, त्यातून आपण खूप काही शिकले पाहिजे,असं गिल्बर्ट यांनी सांगितले.

अँटिबॉडीचा परिणाम ओमिक्रॉन विषाणूवर होईल का यावर बोलताना डेम सारा गिल्बर्ट म्हणाल्या, अनेक बदल या विषाणूच्या स्पाईक प्रोटिनमध्ये झाले आहेत. त्यामुळे या विषाणूची संसर्ग क्षमता वाढली आहे. या विषाणूची रचना वेगळी असल्यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीमुळे शरीरात तयार झालेली रोगप्रतिकारक शक्ती या विषाणूंचा संसर्ग रोखू शकणार नाही, असे देखील होऊ शकते.