चैत्यभूमीवर समीर वानखेडे; नवाब मलिकांनी लगावला टोला


मुंबई : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे जातीच्या मुद्यावरून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांच्या रडारवर आहेत. समीर वानखेडे आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल झाले. पण वानखेडेंच्या उपस्थितीवर भीमशक्ती रिपब्लिकन सेनेने आक्षेप नोंदवला आहे. चैत्यभूमीवर येण्याचा समीर वानखेडेंना नैतिक अधिकार नसल्याची भूमिका भीमशक्ती रिपब्लिकन सेनेने घेतली आहे.

दरम्यान यावरुन नवाब मलिक म्हणाले की, प्रत्येकाचाच बाबासाहेबांना अभिवादन करण्याचा अधिकार आहे. मग तो कोणत्याही धर्माचा असो वा जातीचा. पण येथे काही लोकांनी नव्याने येण्यास सुरुवात केली हे चांगलेच आहे. जो संघर्ष मी सुरु केला आहे, त्याचा जयभीम इम्पॅक्ट आता सुरु झाला आहे. एवढ्या वर्षात अभिवादनाकरता समीर वानखेडे हे कधी चैत्यभूमीवर आले का नाही, हे मला माहित नाही पण, माझ्यासोबत ते नमाज पठण करायला नियमितपणे यायचे हे माहिती असल्याचे मलिक म्हणाले.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. शेकडो आंबेडकरी अनुयायांनी मध्यरात्रीपासून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी रांगा लावल्या आहेत. गर्दी होऊ नये तसेच कोरोना बाबतचे नियम पाळले जावेत म्हणून येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील कोरोनाचे संकट कायम असल्याने प्रशासनाने कोरोनाबाबत सुरक्षेचे उपाय योजना करण्याचे आवाहन केले होते. तरी देखील शेकडो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत.