नीट पीजी काऊन्सिलिंग प्रक्रिया जलदगतीने व्हावी यासाठी राज्यातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर


मुंबई – आजपासून राज्यातील निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. हा संप नीट पीजी काऊन्सिलिंग प्रक्रिया जलदगतीने व्हावी यासाठी पुकारण्यात आला आहे. 27 नोव्हेंबरपासून देशभरातील निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. या आंदोलनात आता राज्यातील निवासी डॉक्टरांची संघटना मार्ड देखील सहभागी झाली आहे.

निवासी डॉक्टरांनी मुंबईतील शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाबाहेर आंदोलन केले. रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची संख्या कमी असल्यामुळे सध्या कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांवर अधिक ताण येत आहे. त्यामुळे केंद्रावर रोष व्यक्त करण्यासाठी आणि प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी संपावर जात असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. रुग्णांचे हाल होऊ नये, यासाठी प्राध्यापक वर्ग आणि इतर डॉक्टर्स काम करत असल्याचे सांगण्यात आले आहे.

राज्य सरकारने देखील निवासी डॉक्टरांच्या संपाची दखल घेतली आहे. राज्य सरकारकडून निवासी डॉक्टरांच्या शिष्टमंडळाला समस्या समजून घेण्यासाठी निमंत्रण पाठवण्यात आले आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या उपस्थिती संध्याकाळी ५ वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार आहे. केंद्राला यासंदर्भात राज्य सरकारने पत्र पाठवावे आणि पीजी-नीट काऊन्सिलिंग प्रक्रिया जलदगतीने व्हावी, अशी मागणी निवासी डॉक्टरांनी राज्य सरकारकडे केली आहे.

निवासी डॉक्टरांच्या देशात एकूण 50 हजार जागा आहेत. राज्यात निवासी डॉक्टरांच्या पहिल्या वर्षाच्या एकूण अडीच हजार जागा आहेत. राज्यात साडे पाच हजारच्या जवळपास निवासी डॉक्टर सध्या कार्यरत आहेत. पण पीजी-नीटच्या जागा अद्यापही न भरल्यामुळे निवासी डॉक्टरांवर अधिकचा ताण आला आहे. मुंबईतील रुग्णालयांचा फक्त ४०० निवासी डॉक्टरांवर भार आहे. डॉक्टरांची संख्या कमी असल्यामुळे रुग्णसेवा देताना अडचणी येत असल्याचे निवासी डॉक्टरांनी म्हटले.