दोन्ही डोस घेऊनही ओमिक्रॉन होत असेल तर आता बुस्टर डोस घ्यावा की नाही? अजित पवार


मुंबई : केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने ओमिक्रॉनचे वाढते संकट पाहता कडक धोरण जाहीर करणे आणि अवलंबन हे अतिशय गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळे ज्या-ज्या शहरांमध्ये आहेत, तिथे एक वेगळी विशिष्ट नियमावली असायला हवी, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारने लवकरात लवकर बुस्टर डोसबाबतचा निर्णय स्पष्ट करावा, बुस्टर डोस द्यायचा आहे, तर तो का द्यायचा? आणि जर नाही द्यायचा, तर का नाही द्यायचा? याचे स्पष्टीकरण दिले पाहिजे, असेही अजित पवार म्हणाले. तसेच जागतिक आरोग्य संघटनेनेही (WHO) ओमिक्रॉनच्या वाढत्या संसर्गाबाबत तातडीने पावले उचलली पाहिजे, असेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार चैत्यभूमीवर महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दाखल झाले होते. त्यांनी त्यावेळी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी ओमिक्रॉनच्या संकटावरही भाष्य केले. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांसह प्रशासनाचे ओमिक्रॉनबाबत बारकाईने लक्ष आहे. वेगवेगळ्या राज्यांतही इतर देशांतून येणाऱ्या नागरिकांबाबत केंद्र सरकारनेही कडक भूमिका घेणे गरजेचे आहे. जिथे-जिथे देशात आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, त्या सर्व ठिकाणी नियमांचे पालन अतिशय काटेकोरपणे होत आहे की, नाही? हे पाहणे गरजेचे आहे.

एक जोडपे दुबईहून दोन वर्षांपूर्वीच्या मार्च महिन्यात राज्यात आल्यानंतर त्यांना घरी सोडणाऱ्या ड्रायव्हरला कोरोना झाला आणि तो संपूर्ण राज्यभरात फोफावला. आताच्याही काळात देशातील वेगवेगळ्या राज्यांत एक-दोन असे रुग्ण आढळून आले होते. पण जिथे कुटुंबाला लागण झाली. त्यांच्यासोबत त्यांच्या नातेवाईकांनाही संसर्ग झाल्याचे पाहायला मिळाले. अनेकजण सांगतात काळजी घ्या, मास्क वापरा याची तीव्रता पूर्वीच्या तुलनेत कमी आहे. पण यासंदर्भात देशपातळीवर आरोग्य विभागाने आणि जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत स्पष्टीकरण देणे गरजेचे असल्याचेही अजित पवार म्हणाले.

याप्रकरणी अधिक माहिती घेतल्यानंतर स्पष्ट झाले की, दोन डोस ज्यांनी घेतले होते. त्यांनाच या व्हेरियंटची बाधा झाली आहे. मग बुस्टर डोसची गरज आहे का? आपल्याकडे आज डोस उपलब्ध आहेत. त्यासंदर्भातही देशपातळीवर निर्णय घेणे आवश्यक असल्याचेही अजित पवार म्हणाले.