तेजप्रताप यादव यांनी पेन विकणाऱ्या मुलीला दिला नवा आयफोन

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद आणि रबडीदेवी यांचे चिरंजीव तेजप्रताप यांच्या विषयी नेहमीच काही उटपटांग बातम्या येत असतात. तेजप्रताप यांचा विवाह, घटस्फोट, स्वतःला कृष्णअवतार, शिव अवतार समजणे अश्या एक ना दोन बातम्या नेहमीच सोशल मिडीयावर व्हायरल होतात. आताही अशीच एक बातमी सोशल मिडियावर व्हायरल झाली असून त्यातून मात्र तेजप्रताप यांच्या दिलदारीचे दर्शन घडले आहे.

शनिवारी सायंकाळी आवडती मिठाई चमचम खाण्यासाठी तेजप्रताप पाटण्याच्या बोरिंग रोडवरील दुकानात जात असताना त्यांना रस्त्यावर पेन विकणारी एक लहान मुलगी दिसली. मेघा नावाच्या या मुलीशी तेजप्रताप यांनी गप्पा मारल्या तेव्हा तिचे वडील रिक्षा चालवतात आणि मेघा शाळेत जात नाही असे त्यांना समजले. तेजप्रताप यांनी तिला स्वतःचा मोबाईल नंबर देऊन फोन करण्यास सांगितले तेव्हा मेघाने तिच्याकडे फोन नाही असे सांगितले. लगेच तेजप्रताप तिला घेऊन अॅपल स्टोरमध्ये गेले आणि तिला ५० हजाराचा नवा आयफोन खरेदी करून दिला. अभ्यास कर असा सल्ला देताना त्यांनी तिला फोन कसा वापरायचा याचेही ज्ञान दिले. तेजप्रताप यांनी स्वतः हा व्हिडीओ शेअर केला आहे.

मेघाने मात्र फोन घेऊन देणारा माणूस कोण याची माहिती नसल्याचे सांगितले आणि नंतर  ते लालूप्रसाद यांचे पुत्र आहेत असे समजल्याची माहिती दिली. तेजप्रताप यांनी तिला स्वतःचा नंबर दिला आहे असेही मेधा म्हणाली. यापूर्वी अनेकदा तेजप्रताप झोपडपट्टी मध्ये जाऊन तेथील मुलांशी संवाद साधताना दिसले आहेत. त्यांनी त्यांचा वाढदिवस सुद्धा २९ दलित मुलांच्या समवेत साजरा करून त्यांना केक खिलविला होता आणि कपडे भेट दिले होते.