ओमिक्रॉन सुपरमाईल्ड – जागतिक आरोग्य संघटनेकडून दिलासा

करोनाच्या नव्या व्हेरीयंट ओमिक्रॉनने जगभरात दहशत फैलावली आहे आणि अनेक देशांनी यासंदर्भात प्रतिबंध लागू केले असतानाच जागतिक आरोग्य संघटनेने दिलासादायक माहिती दिली आहे. जगातील बहुतेक देशांनी आंतरराष्ट्रीय उड्डाणाबाबत नव्या गाईडलाईन जारी केल्या आहेत मात्र जागतिक आरोग्य संघटनेने देशांनी ही प्रवासबंदी उठवावी असे आवाहन केले आहे. नव्याने आलेला आणि अतिशय वेगाने फैलावत असलेला द. आफ्रिकेतून जगप्रवासाला निघालेला ओमिक्रॉन करोना विषाणू अगदी सौम्य स्वरूपाचा म्हणजे सुपर माईल्ड असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे.

वैज्ञानिकांनी अजून ओमिक्रॉन बद्दल कोणताही ठोस निर्णय जाहीर केलेला नाही. मात्र या विषाणूची सर्वप्रथम परीक्षा केलेल्या डॉक्टरच्या म्हणण्यानुसार हे म्युटेशन सुपर माईल्ड आहे. डेल्टा इतके ते धोकादायक नाही. कारण या विषाणूची बाधा झालेले जे पहिले चार रुग्ण सापडले त्यांच्या मध्ये लक्षणे अगदी सौम्य स्वरुपाची होतीच पण या विषाणूने अजून तरी एकही बळी घेतलेला नाही. हे चारी रुग्ण आजारातून पूर्ण बरे झाले आहेत.

यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने देशांनी लागू केलेली प्रवासबंदी उठवावी, भीती आणि अफवा यांवर नियंत्रण आणावे आणि भीती ऐवजी सावधानता बाळगण्यास नागरिकांना प्रवृत्त करावे असे आवाहन केले आहे. ओमिक्रॉन विषाणू आत्तापर्यंत ५० वेळा म्युटेट झाला असला आणि त्याचा फैलाव अतिशय वेगाने होत असला तरी तो डेल्टा इतका भयानक नाही असे सांगितले जात आहे. भारतात या विषाणूचे एकून २१ संशयित रुग्ण आढळले असून त्यातील आठ महाराष्ट्रात मिळाले आहेत.