या देशात पेट्रोल सर्वात महाग, या देशात सर्वात स्वस्त

पेट्रोल दरवाढ हा नेहमीच नागरिक, राजकीय विरोधी पक्ष यांच्या जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. भारतात बहुतेक राज्यात पेट्रोल शंभरीच्या पुढे गेल्याने महागाई वाढत असल्याचे आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीस आल्याची ओरड सुरु झाली आहे. पण जगात अनेक देशात हीच परिस्थिती आहे. अनेक देशात पेट्रोल अतिशय महाग मिळते आहे तर काही देशात मात्र ते पाण्यापेक्षाही स्वस्त दराने विकले जात आहे.

ग्लोबल पेट्रोल प्राईस वेबसाईट वरील माहितीनुसार सर्वात महाग पेट्रोल हॉंगकॉंग येथे विकले जात आहे. तेथे पेट्रोलचा दर लिटरला भारतीय चलनात १९० रूपये आहे. १६ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या काळात केलेल्या एका सर्व्हेक्षणानुसार पेट्रोलच्या सरासरी किमती २१ टक्के वाढल्या आहेत. नेदरलंडच्या अॅमस्टरडॅम मध्ये पेट्रोलचा एक लिटरचा दर १६४.०३, नॉर्वेच्या ओस्लो मध्ये १५५, इस्रायलच्या तेल अवीव मध्ये १५१ रुपये असे आहेत. या यादीत भारताचा नंबर जगात ५६ वा आहे.

भारतात केंद्र सरकारने पेट्रोलवरील आयात कर कमी केल्यावर अनेक राज्यांनी पेट्रोल वरील वॅट कमी केला आहे. अश्या राज्यात पेट्रोलचे दर लिटरला १०० रुपयांच्या खाली आहेत. जगात सर्वात स्वस्त पेट्रोल व्हेनेझुएला येथे विकले जात असून तेथे पेट्रोलचा एक लिटरचा दर १रुपया ८६ पैसे इतका आहे. पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका आणि चीन या देशात पेट्रोलचा दर भारतापेक्षा कमी आहे. मात्र महाग पेट्रोल असलेल्या पहिल्या १० देशात भारताचा समावेश नाही.