ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन


नवी दिल्ली – वयाच्या ६७ व्या वर्षी ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन झाले आहे. दिल्लीतील अपोलो रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) त्यांच्यावर उपचार सुरू होते. २९ नोव्हेंबर रोजी त्यांना तब्येत बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची मुलगी अभिनेत्री मल्लिका दुआने ३० नोव्हेंबरला वडिलांची तब्येत बिघडल्याची माहिती दिली होती. आताही मल्लिकाने इंस्टाग्राम पोस्ट करत वडिलांच्या मृत्यूची माहिती दिली. या वर्षी सुरुवातीला विनोद दुआ यांना कोरोना संसर्ग झाल्याचेही समोर आले होते. त्यांच्या पत्नी रेडिओलॉजिस्ट पद्मावती चिन्ना दुआ यांनाही जून २०२१ मध्ये कोरोना संसर्ग झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता.

१९७४ मध्ये दूरदर्शनपासून विनोद दुआ यांनी कामाला सुरुवात केली. पुढे त्यांनी एनडीटीव्ही, सहारा अशा इतरही वृत्तवाहिन्यांसोबत काम केले. काही काळाने त्यांनी स्वतःची प्रोडक्शन कंपनी काढून विविध वृत्तवाहिन्यांसाठी कार्यक्रम सादर केले. तेव्हाच्या डेरा इस्माईल खान आणि सध्याच्या पाकिस्तानातील खैबर-पख्तुन्वा प्रांतात विनोद दुआ यांचा जन्म झाला होता. निर्वासितांच्या छावणीत त्यांचे बालपण गेले. त्यांनी बोफोर्स प्रकरणात घेतलेल्या विविध मंत्र्यांच्या मुलाखती चांगल्याच गाजल्या. त्यांच्या पत्रकारितेतील कामासाठी त्यांना रामनाथ गोएंका आणि पद्मश्री अशा प्रतिष्ठित पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे.

तत्पूर्वी आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये मल्लिका दुआने म्हटले आहे , बाबांना रात्री अपोलो रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. तेथे त्यांची अधिक चांगली काळजी घेतली जाईल. त्यांची तब्येत अतीशय नाजूक आहे. ते त्यांच्या संपूर्ण आयुष्यात एक लढाऊ व्यक्ती होते. त्यांनी कधीही तडजोड केली नाही. याबाबतीत ते आपल्या कुटुंबाची वेळ आली तेव्हाही तसेच राहिले. मी आणि माझी बहिण ठीक आहोत. आमचे पालनपोषण खूप कणखरपणे केल्यामुळे आम्ही बाबांची पूर्ण काळजी घेऊ. डॉक्टरांच्या सकाळच्या तपासणीनंतर जी माहिती येईल मी नंतर ती माध्यमांना देईल, असेही मल्लिकाने नमूद केले होते. यावेळी तिने तिच्या आईविषयी देखील आठवण काढली होती.