दक्षिण आफ्रिकेतून कर्नाटकात परतलेल्या १० प्रवाशांचा थांगपत्ता नाही


बंगळुरु – एकीकडे जगाची चिंता ओमिक्रॉन प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर वाढलेली असतानाच कर्नाटकात मात्र हलगर्जीपणाचा कळस दिसून आला आहे. राज्यात सापडलेला देशातील पहिला ओमिक्रॉनाचा रुग्ण रुग्णालयात दाखल करुनही रातोरात दुबईला पळून गेल्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेतून परतलेले तब्बल १० प्रवासी विमानतळावरची अनिवार्य कोरोना चाचणी चुकवून बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे.

कसल्याही प्रकारे या १० लोकांशी संपर्क होऊ शकला नाही, त्यांचे फोनही बंद असल्यामुळे या १० जणांना बेपत्ता घोषित करण्यात आले आहे. बंगळुरू विमानतळावर कडेकोट बंदोबस्त असूनही अनिवार्य असलेली कोरोना चाचणी चुकवत या १० जणांनी तिथून पळ काढला आहे. नक्की कसे काय हे १० जण सुटून गेले याबद्दल प्रशासन सध्या गोंधळात आहे. पण या प्रकारामुळे संतप्त झालेले राज्याचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी आजच्या रात्रीतच या प्रवाशांना शोधून काढण्याचे आदेश दिले आहेत.

ही परिस्थिती समजावून घेण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही तात्काळ उच्चस्तरीय बैठक बोलावली. या बैठकीत बोलताना राज्याचे महसूल मंत्री आर. अशोक यांनी सांगितले की रात्रभरात बेपत्ता झालेले हे १० लोक सापडायला हवेत आणि त्यांच्या चाचण्याही झाल्या पाहिजेत. कोणत्याही प्रवाशाला त्यांचा कोरोना अहवाल आल्याशिवाय विमानतळ सोडण्याची परवानगी नाही.

ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण हा कर्नाटकातच सापडला असून तो ६६ वर्षीय दक्षिण आफ्रिकी नागरीक आहे. पण त्यानेही एका खासगी लॅबकडून कोरोना निगेटिव्ह अहवाल घेत दुबईला पळ काढल्याचे राज्य सरकारने शुक्रवारी सांगितले. ही व्यक्ती २० नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतून आली होती आणि त्यानंतर सातच दिवसात तो दुबईला पळून गेला. याबद्दल महसूल मंत्री अशोक म्हणाले, आम्ही यासंदर्भात पोलिसांत तक्रार दिलेली आहे. शांग्रिला हॉटेलमध्ये नक्की काय घडले जिथून तो पळून गेला, याचा शोध घेणे सुरू आहे.