शास्त्रज्ञांनी वर्तवली शक्यता; ओमिक्रॉन विषाणूमुळे तिसरी लाट येऊ शकते, पण…


नवी दिल्ली – एकीकडे ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे जागतिक पातळीवर मोठी चर्चा सुरू झाली आहे. सध्याच्या लसी या व्हेरिएंटवर प्रभावी ठरतील की नाही? येथपासून ते तिसऱ्या लाटेचे संकट येईल का आणि आले तर ओमिक्रॉनमुळेच येईल का? येथपर्यंत सर्व बाबतीत दावे केले जात आहेत. ओमिक्रॉन व्हेरिएंट सापडण्याच्याही आधीपासून तिसऱ्या लाटेविषयीची भिती व्यक्त केली जात होती. तिचे स्वरूप किती धोकादायक असेल, याविषयी मतमतांतरे होती. पण, आता वेगाने प्रसार होण्याचा गुणधर्म असलेला ओमिक्रॉन व्हेरिएंट सापडल्यामुळे तिसऱ्या लाटेविषयी पुन्हा दावे केले जात आहेत. ओमिक्रॉनमध्ये तिसरी लाट तयार करण्याचे सर्व गुणधर्म असल्याचा दावा सीएसआयआरचे संचालक डॉ. अनुराग अग्रवाल यांनी एएनआयशी बोलताना केला आहे.

आपण जर कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा अभ्यास केला, तर तिसरी लाट तयार करू शकणाऱ्या व्हेरिएंटचे सर्व गुणधर्म त्याच्यात आहेत. मानवी प्रतिकारशक्तीला तो बेमालूमपणे चकवा देऊ शकतो, हे समोर आलेल्या अभ्यासातून दिसून आले असल्याचे डॉ. अग्रवाल म्हणाले. दरम्यान, डॉ. अग्रवाल यांनी तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली आहे. आपण सर्वच विचार करत आहोत, त्याप्रमाणे तिसरी लाट नक्कीच येईल. पण ही लाट कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याच्या स्वरूपात दिसून येईल. पण ती जीवघेणी नसेल. आपल्या आरोग्य यंत्रणेवर ताण निर्माण करण्याएवढे तिचे मोठे स्वरूप नसेल, असे डॉ. अग्रवाल म्हणाले आहेत.

सध्या सर्वात चांगली इम्युनिटी कोणती असेल, तर ती हायब्रिड इम्युनिटी आहे. भारतातील सर्वाधिक लोकसंख्येमध्ये हायब्रिड इम्युनिटी आहे. जर तुम्हाला आधी कोरोनाची लागण होऊन गेल्यानंतर एखादा जरी लसीचा डोस दिला गेला असेल, तर तुमच्यात ती हायब्रिड इम्युनिटी तयार होते, असे देखील डॉ. अग्रवाल यांनी नमूद केले आहे.

लसीकरण झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची सुरुवातीच्या काळात जास्त काळजी घ्यावी लागेल, असे अग्रवाल म्हणाले आहेत. अद्याप लसच घेतली नसलेल्यांची प्रतिकारशक्ती सर्वात कमकुवत असेल. पण दुसऱ्या लाटेच्याही आधी लसीकरण झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घ्यावी लागेल. त्यांना पुन्हा कोरोनाची बाधा होऊ शकते. त्यासाठी बूस्टर डोससारख्या पर्यायाचा विचार करायला हवा, असे ते म्हणाले.