एजाझच्या विक्रमाला टीम इंडियाचे चोख उत्तर; अवघ्या ६२ धावांत न्यूझीलंडचा खुर्दा!


मुंबई – मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना खेळवला जात आहे. या कसोटीचा आज दुसरा दिवस असून आज भारताने ४ बाद २२१ धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली. आज पुन्हा एकदा न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाझ पटेलने जादुई गोलंदाजी करत उरलेल्या सहा गड्यांनाही बाद करत मोठा विक्रम नोंदवला. एजाझने १० बळी घेत भारताचा पहिला डाव ३२५ धावांवर संपुष्टात आणला. प्रत्युत्तरात भारतीय गोलंदाजांनी एजाझच्या या विक्रमाला चोख प्रत्युत्तर देत न्यूझीलंडचा पहिला डाव अवघ्या ६२ धावांवर संपुष्टात आणला. रवीचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराजने भेदक गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या फलंदाजांना हात खोलू दिले नाहीत. न्यूझीलंडचा संघ २६३ धावांनी पिछाडीवर आहे. भारताने फॉलोऑन न देता आपल्या दुसऱ्या डावातील फलंदाजीला सुरुवात केली आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने भन्नाट गोलंदाजी करत न्यूझीलंडला चांगली सुरुवात मिळवून दिली नाही. त्याने कप्तान टॉम लॅथम (१०), विल यंग (४) आणि रॉस टेलर (१) यांना बाद करत तीन धक्के दिले. सिराजने टेलरची दांडी गुल केली. त्यानंतर फिरकीपटू अक्षर पटेलने डॅरिल मिशेलला (८) पायचीत पकडले आणि न्यूझीलंडला चौथा धक्का दिला. विराटने रविचंद्रन अश्विनला चेंडू सोपवला आणि अश्विनने हेन्री निकोल्सची (७) दांडी गुल केली. अवघ्या ३१ धावांत न्यूझीलंडचे ५ फलंदाज बाद झाले. त्यानंतर न्यूझीलंडचे इतर फलंदाज बाद करण्यात भारताने जास्त वेळ गमावला नाही. अवघ्या ६२ धावांत न्यूझीलंडचा पहिला डाव संपुष्टात आला. भारताकडून रविचंद्रन अश्विनने ८ धावांत ४ बळी घेतले. मोहम्मद सिराजने ३ तर अक्षर पटेलने २ बळी घेतले.