संजय राऊतांचा ममता बॅनर्जींना यूपीएच्या नेतृत्वावरुन सल्ला


मुंबई – २०२४ पूर्वी राष्ट्रीय राजकारणात नव्या प्रकारचा प्रयोग यूपीए म्हणजे काय? आता युपीए नाही या ममता बॅनर्जींच्या यांच्या मुंबईतील वक्तव्यांनंतर होण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएचे अस्तित्व ममता बॅनर्जी या पूर्णपणे नाकारत आहे. पण मोदी-शहा यांच्या भाजपला काँग्रेसशिवाय कोणतीही आघाडी तोंड देऊ शकत नसल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

ममता बॅनर्जी या देशातील मोठ्या नेत्या असून जो लढा भाजपाविरुद्ध सुरु आहे, त्यात त्या महत्त्वपूर्ण लढा देत आहेत. ममतांनी ज्याप्रकारे पश्चिम बंगालमध्ये संघर्ष करुन विजय मिळवला, तो प्रेरणादायी आहे. तसेच महाराष्ट्रात निवडणुकांनंतर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तीन वेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आले आणि त्यांनी सरकार बनवले. देशाला पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राच्या राजकारणाने एक दिशा दिली आहे. युपीए कुठे आहे, हा ममतांचा प्रश्न योग्य आहे. वारंवार हाच प्रश्न उद्धव ठाकरेंनीही विचारला आहे.

जर युपीए नाही तर एनडीएसुद्धा कुठे आहे, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. पण २०२४साठी वेगळी आघाडी उभी राहत असेल त्याचा काय फायदा होईल याचा विचार करायला हवा. आधीपासून जी आघाडी आहे, त्याला आणखी मजबूत करा असे आमचे म्हणणे आहे. महाराष्ट्रातही आमचे मतभेद आहेत, तरीही आम्ही सरकार चालवत आहोत. काँग्रेसला दूर ठेवून कोणती आघाडी होत असेल तर हे योग्य नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

काँग्रेससोबत मिळून काम केले तर चांगली आघाडी तयार होईल. महाराष्ट्रामध्ये यूपीए आहे. त्याचेच प्रतिक महाविकास आघाडी आहे. ममतांनी त्यांचे मत मांडले आहे. त्यांचा आदर आम्ही करतो, असेही राऊत म्हणाले. या गोष्टी सर्व आपल्याला विसरून जायला हव्यात. महाराष्ट्रातही आम्ही एकमेकांवर अनेक टीका करतो. पण भाजपला थांबवण्यासाठी आम्ही एकत्र आहोत आणि दोन वर्षांपासून आमचे सरकार चालत आहे. आम्ही एकत्र येऊन काम करु शकतो, हा आदर्श आम्ही देशासमोर उभा केला आहे. ममतांची आम्ही परत भेट घेऊ. आता युपीएला सोनिया गांधी चालवत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वावर कोणी आक्षेप घेतलेला नाही. ममतांच्या मनात आधीपासून आहे की काँग्रेसने नेतृत्व करु नये, पण संवादातून मार्ग निघेल, असे संजय राऊत म्हणाले.

ममतांची आदित्य ठाकरे आणि माझ्यासोबत चर्चा झाली आहे. ममतांनी एक विचार घेऊन शरद पवारांशी संवाद साधला आहे. ममतांच्या बोलण्यातही दम आहे की आज यूपीएचे अस्तित्व नाही. ममतांचे म्हणणे सत्य आहे. कोणतीही आघाडी बनली, तर ती काँग्रेससोबतच बनेल. अनेक राज्यात काँग्रेस मजबूत स्थितीत असल्याचे राऊत म्हणाले.