नवाब मलिक यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी समीर वानखेडेंच्या भावाची न्यायालयात धाव


वाशिम – गेल्या काही महिन्यांपासून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद सुरूच आहे. तो सध्या तरी थंडावला असला तरी आता पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. कारण या दोघांचा वाद आता थेट वाशिम जिल्हा न्यायालयात पोहोचला आहे.

गेल्या काही दिवसांपासून समीर वानखेडे यांच्या जातीबद्दल नवाब मलिक यांनी केलेल्या वक्तव्यामुळे हा वाद उद्भवल्याचे चित्र आहे. समीर वानखेडे यांचे चुलत भाऊ संजय वानखेडे यांनी मलिक यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करावे, अशी मागणी केली होती. वाशिम जिल्हा न्यायालयाने त्याअंतर्गत नवाब मलिक यांनी १३ डिसेंबरला हजर राहून बाजू मांडावी, असा आदेश दिला आहे.

काही दिवसांपूर्वी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी काही आरोप केले होते. त्यांनी या सर्व प्रकरणामागे भाजप नेते मोहित कंबोज यांचा हात असल्याचा दावा केला होता. त्यानंतर कंबोज यांनी मलिकांवर मानहानीचा दावा केला होता. त्यानंतर मलिकांना १५ हजाराचा वैयक्तिक जामीनही मिळाला होता.