ममता बॅनर्जी यांच्या वेगळी आघाडी तयार करण्याच्या प्रयत्नावर संजय राऊत यांनी साधला निशाणा


मुंबई – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वेगळी आघाडी तयार करण्याच्या प्रयत्नावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. सध्या वेगळी आघाडी तयार करणे म्हणजे भाजपला एकप्रकारे मदत करण्यासारखेच होईल, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले. असे केल्यास मला न तुला, घाल कुत्र्याला या म्हणीप्रमाणे स्थिती तयार होईल, असेही त्यांनी टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत नमूद केले.

संजय राऊत पुढे म्हणाले, यूपीए कुठे आहे हा ममतांचा प्रश्न योग्यच आहे. हा प्रश्न सर्वांनाच पडतो. कारण यूपीए म्हणून ज्या आक्रमकपणे काम केले पाहिजे, ती यूपीए सध्या दिसत नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावर फार महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे. यूपीए नाही ठीक आहे, एनडीए तरी कुठे आहे? आज देशात ना यूपीए आहे, ना एनडीए आहे. देशात कधीकाळी एनडीए-यूपीएचे राजकारण चालत होते. यूपीए गेली १०-१५ वर्षे सत्तेत होती. आज शिवसेना, अकाली दल एनडीएतून बाहेर पडले. रामविलास पासवान यांचाही पक्ष बाहेर पडला. अशावेळी २०२४ साठी यूपीए अधिक मजबूतपणे सर्व पक्षांना घेऊन उभी राहिली पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांचे कायम म्हणणे आहे. यूपीएत अनेक पक्ष यायला तयार नसल्याचे दिसते. यात ममता, अखिलेश यादव हे सध्या बाहेर आहेत. त्यांचे मन वळवायला पाहिजे.

आता वेगळी आघाडी करून भाजपलाच मदत केली जाईल. कारण त्यात काँग्रेस किंवा काँग्रेसला मानणारे डीएमके, एनसीपी हे पक्ष त्या आघाडीत नसतील, तर याचा उपयोग होणार नाही. यात डावेही असू शकतात, या आघाडीत ते येतील का, तर नाही. एक यूपीए राहिल आणि एक ममता बॅनर्जी, जो प्रयत्न करत आहेत एक तो राहिल. म्हणजे पुन्हा या सगळ्यातून मला न तुला, घाल कुत्र्याला या म्हणीप्रमाणे स्थिती होईल. ‘तीन तिघाडा, काम बिघाडा’ या प्रमाणे तीन आघाड्या निवडणूक लढवतील. यातून संवाद साधला पाहिजे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

संजय राऊत पुढे म्हणाले, फार समंजस आणि संयमी भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे. ते म्हटले आधी पर्याय उभा करा, नेतृत्वाचे नंतर बघू. आधी एकत्र या असे त्याचे म्हणणे आहे. सोनिया गांधी सध्या यूपीएच्या नेत्या आहेत. त्या आजारपणामुळे सध्या फार सक्रीय दिसत नाहीत. ममता बॅनर्जींनी उचललेला प्रश्न चुकीचा नाही, पण देशात विरोधी पक्षांची मजबूत आघाडी करायची असेल, तर काँग्रेस वगळून ती होऊ शकत नाही. अनेक राज्यांमध्ये काँग्रेस मजबूत आहे. तो एक वैचारिक पक्ष आहे. आमचेही त्यांच्याशी मतभेद आहेत, तरीही महाराष्ट्रात एकत्र आहोत. जर फॅसिस्ट प्रवृत्तींचा सामना करायचा असेल तर तुम्ही काही मतभेद बाजूला ठेऊन एकत्र आले पाहिजे.

यूपीएत शिवसेना कधी जाणार यावर निर्णय उद्धव ठाकरे घेतील. पण, महाराष्ट्रात सध्या जी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची महाविकास आघाडी आहे, ती मिनी यूपीएच आहे. ही पण यूपीएच असल्याचे राऊतांनी नमूद केले. संजय राऊत पुढे म्हणाले, सामना देवेंद्र फडणवीस वाचतात, संपादकीय अग्रलेख वाचतात आणि विचार करतात हे चांगले आहे. जर नरेंद्र मोदी यांचा आजही एक कलमी कार्यक्रम गांधी कुटुंबावर हल्ला करणे असेल, तर त्यांचाही केंद्र गांधी कुटुंबावर आहे. मोदी अजूनही सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यावर हल्ले करतात. त्यांचे एकही राजकीय भाषण नाही, ज्यात मोदी गांधी कुटुंबावर हल्ला करत नाही. पक्षाच्या कार्यकारणी बैठकीत देखील त्यांनी अप्रत्यक्षपणे गांधी कुटुंबालाच लक्ष्य केले.

अनेक पक्षांना एकत्रित घेऊनच ममता बॅनर्जी यांना देखील आघाडी स्थापन करावी लागेल. त्या एकट्या तर संपूर्ण देशभर लढू शकत नाही. त्या त्यांच्या पक्षाचा विस्तार करू शकतात, पण भाजपने आज जी व्यवस्था केली आहे, त्याच्याशी लढण्यासाठी सर्वांना एकत्रच यावे लागेल. मला वाटते अजून काही काळ जाऊ दिला पाहिजे. मी दिल्लीत जाणार आहे. तेथे काही प्रमुख लोकांशी माझा संवाद सुरू आहे. वेगवेगळ्या राज्यातील पक्षांची त्या त्या राज्यातील काही व्यक्तिगत राजकीय मजबुरी असते म्हणून ते वेगळी भूमिका घेतात. असे असले तरी राष्ट्रीय स्तरावर सगळ्यांना एकत्र यावं लागेल, असेही संजय राऊत यांनी सांगितले.