महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पुढील वर्षी घेण्यात येणाऱ्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर


मुंबई – नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्था एमपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. सध्या परिक्षार्थी जानेवारीमध्ये होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२१ च्या तयारीत गुंतले आहेत. त्यातच आता आयोगाने आगामी वर्षातील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

सन २०२२ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. राज्यसेवा परीक्षा, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा याशिवाय इतर परीक्षांचे आयोजन पुढील वर्षी करण्यात येणार आहे.


राज्यातील साधारण चार लाख विद्यार्थ्यांमध्ये एमपीएससीच्या परीक्षा कधी होतील, वेळापत्रक काय असेल, सर्वाधिक पदे कोणत्या परीक्षेसाठी असतील, अशा अनेक प्रश्नांबाबत उत्सुकता असते. त्यामुळे दरवर्षी आयोगाकडून या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक डिसेंबरमध्ये जाहीर होते. २०२२मधील स्पर्धा परीक्षा कोरोना प्रादुर्भावामुळे होतील की नाही, याबाबत साशंकता होती. त्याचबरोबर राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती कमकुवत झाल्यामुळे, यंदा पदभरती होणार नाही किंवा पुढे ढकलण्यात येईल, असे सांगण्यात येत होते. पण, ‘एमपीएससी’ने याबाबत अधिकृत माहिती प्रसिद्ध करून पदभरतीच्या परीक्षा होतील, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर आता आयोगाकडून हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे .

शासनाकडून संबंधित संवर्ग/पदांसाठी विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त होईल या गृहितकाच्या आधारे अंदाजित वेळापत्रक प्रस्तावित करण्यात आले आहे. शासनाकडून विहित वेळेत मागणीपत्र प्राप्त झाल्यासच नियोजित महिन्यामध्ये पदे विज्ञापित करणे व वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेणे शक्य होईल.वेळापत्रक अंदाजित असून जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होऊ शकतो, असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, असं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कळवण्यात आले आहे.