‘जोवाड’ चक्रीवादळाचे संकट! महाराष्ट्राला जोवाडचा कोणताही धोका नाही


मुंबई – बंगालच्या उपसागरात ‘जोवाड’ चक्रीवादळाची निर्मिती झाली असून हे चक्रीवादळ उत्तर आंध्र प्रदेश आणि ओदिशाच्या किनारपट्टी भागात धडकून पश्चिम बंगालच्या दिशेने जाणार आहे. आंध्रप्रदेशच्या किनारपट्टी भागात पोहोचताना वादळाभोवती फिरणाऱ्या चक्रीवादळाचा वेग ताशी 100 किलोमिटरपर्यंत असणार अशी माहिती आहे. सरकारी यंत्रणा या पार्श्वभूमीवर सतर्क झाल्या असून एनडीआरएफच्या 64 टीम ओदिशामध्ये तैनात असल्याची माहिती मिळाली आहे.

जोवाडच्या संकटाचा सामना करण्याच्या तयारीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आढावा घेतला. लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी योग्य ती मदत करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्र यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, शनिवारी आंध्र प्रदेशच्या उत्तरी भागात आणि ओदिशा किनारपट्टीवर पश्चिमी-मध्य बंगालच्या खाडीत चक्रीवादळ पोहोचण्याची शक्यता आहे.

‘जोवाड’ चे किनारपट्टीजवळ येताना तीव्र चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. जमिनीवर वादळ धडकल्यानंतर तीव्रता कमी होणार आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात मोठे नुकसान होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 3 ते 5 डिसेंबरदरम्यान आंध्र प्रदेश, उडीशा आणि पश्चिम बंगालला अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा आहे. पाच डिसेंबरपर्यंत किनारपट्टीवरील सर्व ऑपरेशन्स रद्द करण्यात आली आहेत.

या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका आंध्रतील श्रीकाकुलम, विझियानगरम, विशाखापट्टणम, उडीशातील गजापती, गंजाम, पुरी, नयागड, खुर्दा, कटक, जगतसिंहपूर, केंद्रपारा जिल्ह्यांना बसण्याचा अंदाज आहे. तसेच आंध्र प्रदेश, उडीशा, पश्चिम बंगालसोबतच आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरात देखील पाऊस अपेक्षित आहे.

एनडीआरएफकडून बोटी, वृक्षतोड करणारे, दूरसंचार उपकरणे इत्यादींनी परिपूर्ण असलेले 29 चमू सज्ज ठेवले आहेत, तर 33 चमूंना गरजेनुसार तयार आहे. मदत, शोध आणि बचाव कार्यासाठी जहाजे आणि हेलिकॉप्टर भारतीय तटरक्षक दल आणि नौदलाकडून तैनात करण्यात आले आहे. लष्कराचे हवाई दल आणि अभियंता कृती दल विभाग गरज पडल्यास तैनातीसाठी सज्ज आहे. आपत्ती निवारण पथके आणि वैद्यकीय पथके गरजेनुसार पूर्व किनारपट्टीवर सज्ज करण्यात आली आहे.

या वादळाला सौदी अरेबियाच्या सूचनेवरून ‘जवाद’ असे नाव देण्यात आले आहे. जवाद हा अरबी शब्द असून ज्याचा अर्थ ‘उदार’ असा होतो. यापूर्वी आलेल्या चक्रीवादळांच्या तुलनेत या चक्रीवादळामुळे फारसा विध्वंस होणार नाही आणि सामान्य जनजीवनावर त्याचा फारसा परिणाम होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने 4 डिसेंबरच्या सकाळी वाऱ्याचा वेग ताशी 100 किमी असेल, असे म्हटले आहे.