सोशल मीडियावर आगीसारखी व्हायरल होत आहे ‘फायर पाणीपुरी’


रोजच अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केले जातात. यातील काही व्हिडीओ हे मजेदार आणि थरारक असतात. तर अतिशय महत्त्वाची माहिती काही व्हिडीओंच्या माध्यमातून दिलेली असते. काही व्हिडीओमध्ये खवय्यांसाठी वेगवेगळ्या पदार्थांची माहिती देण्यात आलेली असते. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा सुद्धा अशाच पद्धतीचा आहे. फायर पाननंतर आता ‘फायर पाणीपुरी’ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तुम्ही आता विचार करत असाल की दुकानदाराने पाणीपुरीच्या पाण्यात कशी काय आग लावली असेल? अनेकांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तर कपाळाला हात लावला. कारण एक काळ होता, जेव्हा लोक पाणीपुरी खाताना आंबट, गोड आणि तिखट पाणी निवडायचे. पण या व्हायरल व्हिडीओमध्ये लोक पाणीपुरीवर आग लावून खात आहेत. हे पाहून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल.


सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ अहमदाबादमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. काही सेकंदाच्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक मुलगी रस्त्यावर उभी आहे. एक विक्रेता पाणीपुरीला लायटरच्या मदतीने आग लावतो. हातात पडकलेली ही ‘फायर पाणीपुरी’ तो बाजुला उभी असलेल्या मुलीच्या तोंडात देतो. हे सारे चित्र पाहून तुम्ही हैराण व्हाल. सोशल मीडियावर यापुर्वी ‘फायर पान’चा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर आता या ‘फायर पाणीपुरी’चा व्हिडीओ पाहून लोक आश्चर्यचकीत होऊ लागले आहेत.

या विक्रेत्याच्या स्टॉलला एका फूड ब्लॉगरने स्वतः भेट देत ही ‘फायर पाणीपुरी’ जगासमोर आणली. हा व्हिडीओ ‘foodiekru’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ २६ नोव्हेंबर रोजी अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडीओ आतापर्यंत २ लाख २३ हजार लोकांनी पाहिला आहे. तसंच ८ हजार ४०० पेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. ही संख्या आता सातत्याने वाढत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक त्यावर जोरदार कमेंट करत आहेत.