न्यूझीलंडच्या एजाझ पटेलने रचला इतिहास, टीम इंडियाचा संपूर्ण संघ तंबूत पाठवला


मुंबई – न्यूझीलंडचा गोलंदाज एजाझ पटेल याने मयांक अग्रवालचे दीडशतक आणि अक्षर पटेलच्या अर्धशतकी खेळीवर पाणी फिरवले. जिम लेकर व अनिल कुंबळे यांच्यानंतर कसोटीत एका डावात १० विकेट्स घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला. १९५६मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मँचेस्टर कसोटीत इंग्लंडच्या जिम लेकर यांनी एका डावात १० विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर भारताच्या अनिल कुंबळेने १९९९मध्ये पाकिस्तानविरुद्ध १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता.

टीम इंडियाने पहिल्या दिवशी मयांक अग्रवाल व शुबमन गिल यांच्या फटकेबाजीच्या जोरावर वर्चस्व गाजवले. मयांक व शुबमन गिल यांनी टीम इंडियाला ८० धावांची भागीदारी उभारून दिली, परंतु ३ फलंदाज झटपट माघारी परतले. गिल ७१ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ४४ धावांवर झेलबाद झाला. चेतेश्वर पुजारा पुन्हा अपयशी ठरला. कर्णधार विराट कोहलीला चूकीच्या निर्णयाचा फटका बसला. पण, मयांकने श्रेयस अय्यर व वृद्धीमान साहा यांच्यासह टीम इंडियाचा डाव सावरला पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या ४ बाद २२१ धावा झाल्या होत्या.

एजाझ पटेलने दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच षटकात साहाला (२७) पायचीत केले अन् पुढच्याच चेंडूवर आर अश्विनला अप्रतिम चेंडूवर त्रिफळाचीत केल्यानंतर किवी खेळाडू जल्लोष करत असताना अश्विन डीआरएसची मागणी करताना दिसला. आपण नेमके कसं बाद झालो, हेच त्याला कळेनासे झाले होते. किवी गोलंदाज पटेलची हॅटट्रिक अक्षर पटेलने मात्र हुकवली. अक्षर व मयांक यांनी सातव्या विकेटसाठी दमदार खेळ केला. ही जोडी तोडण्यासाठी टीम साऊदी, कायले जेमिन्सन, विलियम सोमरविले या सर्वांनी प्रयत्न केले, परंतु अखेर यश एजाझ पटेललाच मिळाले. लंच ब्रेकनंतर पटेलने मोठी विकेट घेतली. मयांक ३११ चेंडूंत १७ चौकार व ४ षटकारांसह १५० धावांवर माघारी परतला. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक तीनवेळा १५०+ धावा करण्याचा रोहित शर्माच्या विक्रमाशी मयांकने बरोबरी केली.

प्रतिस्पर्धीच्या आघाडीच्या सात फलंदाजाला घरच्या मैदानावर एकाच गोलंदाजाने बाद करण्याची ही दुसरी वेळ ठरली. याआधी २००२मध्ये मुथय्या मुरलीधरन याने झिम्बाब्वेविरुद्ध असा पराक्रम केला होता. अक्षरने आक्रमक खेळ सुरू करताना सोमरविलेला ४,६,३ असे चोपले. ११३ चेंडूंत अक्षरने कसोटीतील पहिले अर्धशतक पूर्ण केले. पण, एजाझने पुन्हा खोडा घातला, अक्षरला ५२ धावांवर पायचीत करून ८वी विकेटही नावावर केली. न्यूझीलंडकडून कसोटी क्रिकेटमधील ही दुसरी सर्वोत्तम गोलंदाजी ठरली. यापूर्वी रिचर्ड हेडली यांनी १९८५मध्ये ब्रिस्बेन कसोटीत ५२ धावांत ९ विकेट्स घेतल्या होत्या. किवीच्या एकाही गोलंदाजाला आजपर्यंत ७ पेक्षा अधिक विकेट घेता आल्या नाही. तोही पराक्रम एजाझने करून दाखवला. भारताविरुद्ध न्यूझीलंडच्या गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. एजाझने ९वी विकेटही नावावर केली. १० विकेट्स घेताना एजाझने ऐतिहासिक कामगिरी केली. भारताचा पहिला डाव ३२५ धावांवर गुंडाळला.