डॉ. अमोल कोल्हे यांच्या ट्विटमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता


पुणे : शिरुर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या एका ट्विटमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. पुणे विमानतळावर असलेल्या पेन्टिंग्जवरून डॉ. अमोल कोल्हे यांनी ट्विट केले आहे. ही पेन्टिंग्ज पेशवेकालीन असून पेशव्यांच्या पराक्रमाविषयी आदर आहेच, परंतु पुण्यात केवळ शनिवारवाडा नसल्याचेही डॉ. कोल्हे यांनी म्हटले. सध्या सोशल मीडियात त्यांच्या या पोस्टची जोरदार चर्चा सुरू आहे.


पुणे विमानतळावर डॉ. अमोल कोल्हे यांनी सेल्फी घेतला. पुणे विमानतळ प्राधिकरणाला पेशवेकालीन पेन्टिंग्जवरून त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. आपल्या ट्विटमध्ये डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटले की, पेशव्यांच्या पराक्रमाविषयी आदर आहेच, परंतु पुण्यात केवळ शनिवारवाडा नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा लालमहालसुद्धा आहे, सिंहगडही आहे आणि याच जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी, तसेच छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदानस्थळ वढू तुळापूर देखील आहे, याचा पुणे एअरपोर्ट ऑथॅरिटीला विसर पडला की काय? असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला.

नेटकऱ्यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या या ट्विटवर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हे ट्विट अनेकांनी योग्य असल्याचे म्हटले. तर, काही युजर्सने तुम्ही खासदार असून त्यावर कार्यवाही करा अशी मागणी केली आहे. डॉ. कोल्हे यांच्या ट्विटला काहींनी विरोधदेखील केला आहे. एका युजरने पेशव्यांबद्दल आदर असेल, तर पुणे विमानतळाचे नामकरण श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे असे करावे, अशी मागणी केली आहे.