दिव्यांग व्यक्तींना मतदार यादीत नावनोंदणी करण्याचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांचे आवाहन


मुंबई : दिव्यांग व्यक्तींनी मतदार यादीत नाव नोंदणी करुन आपल्या दिव्यांग सहकाऱ्यांचीही नावे मतदारयादीत समाविष्ट करावी. मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा दिव्यागांना देय असलेले लाभ देण्यासाठी आवश्यक मदत करण्यात येईल, असे मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी सांगितले.

मुंबई शहर जिल्ह्यात सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन व महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ यांच्या सहकार्याने दि.3 डिसेंबर हा ‘जागतिक दिव्यांग दिन’ जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र येथे साजरा करण्यात आला. जागतिक अपंग दिनानिमित्ताने दिव्यांग मतदारांची नावे मतदारयादीत नोंदणी करण्याबाबत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जिल्हाधिकारी निवतकर यांचे हस्ते दिव्यांग व्यक्तींना जयपूर फूट व इतर आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.

181-माहिम विधानसभा मतदारसंघाच्या सहकार्याने दिव्यांग मतदारांना केंद्रीत करून मतदार नोंदणीबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात आली. मोहिमेच्या अनुषंगाने माधव पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी मतदारांनी मतदार नोंदणीसाठी फॉर्म-6 कसा भरावा व त्यासोबत कोणती आवश्यक कागदपत्रे सादर करावी याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास दिनेश डिंगळे, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, माधव पाटील, उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई शहर, धोत्रे, सहसचिव, मंत्रालय, मुंबई, समाधान इंगळे, सहा.आयुक्त समाजकल्याण, अरूण भालेराव, लायन्स क्लब ऑफ बॉम्बे अपटाऊन, घाटकोपर व प्रसाद खैरनार, सहा. आयुक्त समाजकल्याण, उपनगर, प्रशांत सावंत, तहसिलदार, निवडणूक विभाग, मुंबई शहर, श्रीमती गुलाब मोरे, नायब तहसिलदार उपस्थित होते.