एसटी कर्मचारी संपावरून देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र!


औरंगाबाद – एसटी कर्मचारी राज्य सरकारने पगारवाढ आणि वेतनहमी या दोन मागण्यांबाबत निर्णय घेतल्यानंतर देखील विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. ही मागणी जोपर्यंत मान्य होत नाही, तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार काही एसटी कर्मचारी संघटनांनी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आता संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्यांतर्गत कारवाईची भूमिका घेण्याचा विचार करत असताना विरोधकांकडून त्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करताना टीका केली जात आहे. यासंदर्भात औरंगाबादमध्ये बोलताना राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

सरकारकडून एसटी कर्मचारी संपाच्या मुद्द्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न होत नसल्याचे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सरकारची भूमिका लोकशाहीविरोधी आहे. मार्ग काढण्याचा कोणताही प्रयत्न सरकारकडून होत नाही. विरोधी पक्ष म्हणून आम्ही भरपूर सहकार्य सरकारला केले. पण सरकारने दोन पावले पुढे यायला हवे, ते सरकार येत नाही, असे फडणवीस म्हणाले आहेत.

सरकारची या मुद्द्यावर भूमिका म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत. मला काल माहिती मिळाली की एक उपोषणकर्ता कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. सरकारच्या संवेदना हरवल्या आहेत. असंवेदनशीलतेचा कळस आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. मेस्मा लावण्याऐवजी सरकारने चर्चेतून मार्ग काढावा, अशी अपेक्षा फडणवीसांनी व्यक्त केली आहे.