बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भाजप महिला आमदारावर आक्षेपार्ह टिप्पणी


पाटना – नेत्यांच्या बैठकीदरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिला भाजप आमदारावर केलेल्या एका टिप्पणीमुळे सध्या ते वादात सापडले आहे. या टिप्पणीमुळे अस्वस्थ झालेल्या या महिला आमदारांनी पक्षश्रेष्ठींकडे या प्रकरणाची तक्रार केली आहे. हा प्रकार २९ नोव्हेंबरला झालेल्या या बैठकीत घडला.

यासंदर्भातील वृत्त जनसत्ताने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली २९ नोव्हेंबर रोजी विधिमंडळाची बैठक झाली. भाजप, जेडीयूसह अन्य काही पक्षांचे आमदार यामध्ये सहभागी झाले होते. या बैठकीदरम्यान अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. या दरम्यान बिहारमधील एकमेव आदिवासींसाठी राखीव असलेल्या जागेवर निवडून आलेल्या भाजप आमदार निक्की हेम्ब्रम यांनीही आपला मुद्दा मांडला. आदिवासींना आपल्या उदरनिर्वाहासाठी ‘महुआ’ गोळा करणे आणि त्याची साठवणूक करण्याला परवानगी देण्याची मागणी केली.

नितीश कुमार त्यांच्या या मागणीनंतर म्हणाले, तुम्ही खूप सुंदर दिसता, पण तुमचे विचार मात्र पूर्णतः वेगळे आहेत. तुम्हाला माहित आहे का, आम्ही अनुसूचित जाती-जमातींसाठी काय काय केले आहे? तुम्ही तुमच्या विधानसभा क्षेत्रात जात नाही. मुख्यमंत्री नितीश कुमार असे म्हणताच बैठकीला उपस्थित असलेले सर्वजण हसू लागले, पण निक्की हेम्ब्रम यांना मात्र अवघडल्यासारखे झाले.

हेम्ब्रम यांनी द टेलिग्राफशी बोलताना सांगितले की, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या या प्रतिक्रियेमुळे त्या काही काळ स्तब्ध झाल्या आणि त्यांना सावरायला थोडा वेळ लागला. त्या म्हणाल्या, मला खूप अवघडल्यासारखे झाले. बहुतेक त्यांना माझ्या चिंतेचा मुद्दा कळला नसावा, पण त्यांनी जे शब्द वापरले, त्यामुळे त्यांनी एका मला अक्षरशः कोर्टात जाब विचारायला उभे केल्यासारखे वाटले. त्यांना आम्ही राज्याचे प्रमुख आणि आमचे रक्षणकर्ते मानतो, पण त्यांचे हे वागणे योग्य नव्हते. त्यांनी मला चेष्टेचा आणि विनोदाचा विषय बनवले. लोक माझ्यावर हसत होते. हे पुरुषांचे जग आहे. एका महिलेला आपला स्वाभिमान आणि आपल्या परिवाराची प्रतिष्ठा अबाधित राखण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे आणि सावध राहिले पाहिजे.

निक्की हेम्ब्रम यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे घडल्या प्रकाराची तक्रार केली असून आता मी हे प्रकरण त्यांच्या ताब्यात दिल्याचे त्या म्हणाल्या. पक्षश्रेष्ठींकडून केल्या जाणाऱ्या कारवाईची मी वाट पाहीन आणि त्यांनी कारवाई केल्यानंतरच पुढची पावले उचलेन, असेही हेम्ब्रम यांनी सांगितले.