अजिंक्य रहाणेबाबत ‘मोठा’ निर्णय घेण्याच्या तयारीत बीसीसीआय !


मुंबई – गेल्या दोन वर्षांपासून आपल्या फॉर्मशी भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे झुंजत आहे. त्याच्या कसोटी संघातील स्थानावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मुंबई कसोटीच्या प्लेइंग-११ मधून त्याला बाहेर ठेवण्यात आले होते. यासाठी बीसीसीआयने दुखापतीचे कारण दिले. पण त्याचा फॉर्म पाहता, हे कारण पचवणे थोडे कठीण आहे. आता रहाणेसाठी आणखी अडचणी निर्माण होऊ शकतात. कारण या महिन्यात बीसीसीआय दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघाचा उपकर्णधार म्हणून रोहित शर्माच्या जागी विचार करत आहे. त्याची घोषणाही लवकरच होऊ शकते.

टाइम्स ऑफ इंडियाला बीसीसीआयच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले, लवकरच दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवड बैठक होणार आहे. रोहित शर्माला संघाचा उपकर्णधार बनवण्याची शक्यता जास्त आहे. भारतीय संघाचा दक्षिण दौरा निश्चित आहे. पण, वेळापत्रक बदलणार आहे. याबाबत क्रिकेट दक्षिण आफ्रिकेला बीसीसीआयने माहिती दिली आहे.

गेल्या वर्षी विराटच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अजिंक्य रहाणेने संघाची धुरा सांभाळली होती. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकली. पण, त्याची बॅटने कामगिरी काही खास झाली नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी होती. पण तो पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याने कानपूर कसोटीतही संघाची धुरा सांभाळली होती. पण विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचूनही भारताला ही कसोटी जिंकता आली नाही. हा सामना अनिर्णित राहिला.

गेल्या एका वर्षात ३३ वर्षीय रहाणेने १४ कसोटीत २४.६६ च्या सरासरीने ५९२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने केवळ एक शतक झळकावले आहे. हे त्याच्या कारकिर्दीच्या ४० च्या सरासरीपेक्षा खूपच कमी आहे. २०२१ मध्ये रहाणेने १२ कसोटी सामन्यांमध्ये २० च्या सरासरीने ४११ धावा केल्या आहेत आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या ६७ धावा आहे. कानपूर कसोटीच्या दोन्ही डावांसह त्याला केवळ ३९ धावा करता आल्या. अशा स्थितीत त्याला संघातून वगळले जाण्याचा धोका आहे.