पेप्सिकोचे चिप्ससाठीच्या बटाट्याचे पेटंट रद्द

भारताने पेप्सिकोच्या लोकप्रिय लेज चिप्स बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खास एफसी ५ बटाटा वाणाचे पेटंट रद्द केले आहे. यामुळे आता कुणीही शेतकरी बटाट्याच्या या वाणाची लागवड करून उत्पादन घेऊ शकणार आहेत. या जातीच्या बटाट्यात पाण्याचे प्रमाण कमी असते यामुळे त्यापासून उत्तम प्रकारचे चिप्स बनविता येतात.

मिडिया रिपोर्टनुसार प्रोटेक्शन ऑफ प्लांट व्हरायटीज अँड फार्मर्स राईट अॅथॉरिटीने शुक्रवारी पेप्सिकोला दिला गेलेला बौद्धिक संपदा हक्क हटविण्याचा आदेश जारी केला आहे. २०१९ मध्ये पेप्सिकोने गुजराथ मधील काही शेतकऱ्यांना हे बटाटा बियाणे दिले होते असा दावा केला होता मात्र त्याविरुद्ध आवाज उठविला गेल्यानंतर हा दावा कंपनीने मागे घेऊन सहकार्याने यातून मार्ग काढण्याचा पवित्रा घेतला होता. फार्मर्स राईट कार्यकर्त्या कविता कुरुंगती यांनी या विरुध्द याचिका दाखल करून एफसी ५ वाणाला दिला गेलेला बौद्धिक संपदा हक्क रद्द करावा अशी मागणी केली होती.

बटाट्याचे हे एक प्रकारचे बियाणे आहे आणि त्यावर पेटंट घेता येत नाही हा मुद्दा मान्य केला गेला. पेप्सिकोने बटाट्याची ही जात विकसित करून त्याची २०१६ मध्ये नोंदणी केल्याचे म्हणणे मांडले होते पण ते मान्य केले गेले नाही असे समजते. पेप्सिकोने १९८९ मध्ये पहिला चिप्स प्रकल्प सुरु केला होता. शेतकऱ्यांच्या एका गटाला बटाट्याचे हे बियाणे देऊन तयार बटाटा एका नक्की किमतीला कंपनी खरेदी करत असे.