महान धावपटू उसेन बोल्टला आयपीएल खेळण्याची  इच्छा

जमैकाचा जगप्रसिद्ध अॅथलेट आणि आठ वेळा ऑलिम्पिक चँपियन ठरलेला धावपटू उसेन बोल्ट याने भारताच्या लोकप्रिय क्रिकेट लीग आयपीएल मध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. क्रीडा क्षेत्रात बडे नाव असलेल्या उसेनने  ट्रॅक अँड फिल्ड स्पर्धेत अजोड कामगिरी केली आहे. मात्र तरीही या ३५ वर्षीय खेळाडूने त्याचे पहिले प्रेम अॅथलेटिक्स नाही तर क्रिकेट होते असे एका मुलाखतीत सांगितले आहे.

जमैकाचे क्रिस गेल आणि आंद्रे रसेल भारताच्या या लोकप्रिय लीग मध्ये सुपरस्टार म्हणून नाव कमावून आहेत. उसेन सांगतो त्याला लहानपणापसून क्रिकेटचे आकर्षण होते कारण त्याच्या वडिलांना सुद्धा क्रिकेटची खूपच आवड होती. त्यामुळे क्रिकेटशी त्याचा चांगला परिचय आहे. या खेळात नशीब आजमावून पाहण्याची त्याला इच्छा आहे. २०२२ आयपीएल साठी उसेन तयार आहे. तो म्हणतो,’ मी प्रशिक्षण घेईन, फिट होईन आणि ही स्पर्धा कदाचित खेळेन.’

उसेन सांगतो लहानपणी त्याला पाकिस्तान क्रिकेट टीम फार आवडत होती आणि वकार युनुस हा महान गोलंदाज आहे असेच त्याला वाटत असे. पण वय वाढत गेले तसे आपण आपल्या स्थानिक टीमचे समर्थन केले पाहिजे ही भावना वाढीस लागली. २०१७ मध्ये उसेन याने ट्रॅक अँड फिल्ड खेळातून संन्यास घेतला आहे. त्यानंतर त्याने काही काळ फुटबॉल खेळात सहभाग घेतला होता.