नारायण राणे यांना आता झेड दर्जाची सुरक्षा
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना शनिवार पासून झेड दर्जाची सुरक्षा पुरविली गेली आहे. यापूर्वी २१ डिसेंबर २०२० पासून त्यांना वाय प्लस श्रेणीची सुरक्षा दिली जात होती. मात्र राणे यांना वारंवार धमक्या मिळत असून त्यांच्या जीवाचा धोका वाढला असल्याने त्यांची सुरक्षा वाढविली गेली असल्याचे सांगितले जात आहे. सीआयएसएफ (केंद्रीय आद्योगिक सुरक्षा बल)चे डीआयजी व मुख्य प्रवक्ते डॉ. अनिल पांडेय यांनी या बातमीला पुष्टी दिली आहे.
झेड सुरक्षा नियमानुसार नारायण राणे आता देशभरात कुठेही गेले तरी त्यांच्या सोबत ६ ते ७ सशस्त्र कमांडो चोवीस तास बरोबर राहणार आहेत. नारायण राणे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. काही महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यावर ते महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी अनुदगार काढले होते आणि त्याविरोधात शिवसेनेने जोरदार हरकत घेतली होती. इतकेच नव्हे तर राणे यांना केंद्रीय मंत्रीपदाचे प्रोटोकॉल मोडून अटक करण्यात आली होती आणि नंतर ते जामिनावर सुटले होते. यावेळी सुद्धा राणे यांना वाय सुरक्षा होती.
यानंतर सुद्धा नारायण राणे यांना सतत धमक्या दिल्या जात असल्याचे दिसून आल्याने त्यांची सुरक्षा श्रेणी वाढविली गेल्याचे सांगितले जात आहे.