ओमिक्रॉनवर आनंद महिंद्र यांनी शेअर केली मजेदार माहिती
करोनाच्या ओमिक्रॉन व्हेरीयंटची चर्चा, काळजी आणि भीती जगभरातील देशांकडून व्यक्त होत असताना भारतीय उद्योगपती आनंद महिंद्र यांनी एका खास माहिती शेअर केली आहे. उद्योजक आनंद महिंद्र सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असतात आणि सातत्याने विविध प्रकारची रोचक माहिती शेअर करत असतात.
आता ओमिक्रॉन व्हेरीयंट वरची माहिती शेअर करून त्यांनी सर्वाना धक्का दिला आहे. आनंद महिंद्र यांनी त्यांच्या ट्वीटर अकौंटवर एका फिल्मचे पोस्टर शेअर केले आहे. ५८ वर्षापूर्वी इटालियन चित्रपट ‘द ओमिक्रॉन व्हेरीयंट’ रिलीज झाला होता त्याचे हे पोस्टर आहे. कॅप्शन मध्ये महिंद्र लिहितात, ‘माझ्या शाळेतील दोस्ताने सामान्य ज्ञान ट्रीवीया पाठविला आहे आणि पूर्वीच ओमिक्रॉन वर चित्रपट बनविला गेला होता याची माहिती शेअर केली आहे. यात एलियन पृथ्वीवर येतात आणि माणसाच्या शरीरावर कब्जा करून पृथ्वी कशी ताब्यात घेता येईल याचे परीक्षण करतात असा विषय मांडला गेला होता.
विशेष म्हणजे बॉलीवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनीही याच चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे आणि हे पोस्टर सोशल मिडीयावर वेगाने व्हायरल झाले आहे. विशेष म्हणजे २०१३ मध्ये एक चित्रपट याच थीमवर आला होता आणि त्याचे नाव होते ‘द व्हिजीट फ्रॉम प्लॅनेट ओमिक्रॉन’. आता बोला!