या देशाने घेतला लसीकरण न झालेल्या नागरिकांसाठी लॉकडाऊनचा निर्णय


बर्लिन – कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होऊ यासाठी जगभरातील अनेक देशांनी लॉकडाऊन जाहिर लागू केला होता. एकीकडे कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहिम राबवण्यात आली. पण दुसरीकडे लसीकरण करण्याला नकार देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये लसीकरण मोहिमेत मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यातच आता जर्मनीने लसीकरण पूर्ण करण्यासाठी आणि कोरोनाची संभाव्य चौथी लाट रोखण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना लसीकरण न केलेल्या नागरिकांसाठी लॉकडाउनचे निर्बंध लागू केले आहेत. लस न घेतलेल्या नागरिकांना दोन-तीन अत्यावश्यक ठिकाणे वगळता कुठेही जाता येणार नाहीत.

हा निर्णय ‘राष्ट्रीय एकते’च्या भावनेतून घेण्यात आल्याचे जर्मनीच्या मावळत्या चान्सलर एजेंला मर्केल यांनी सांगितले. लसीकरण झालेल्या नागरिकांना रेस्टोरंट्स, चित्रपटगृह, मनोरंजन स्थळे आदी ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. तर, लस न घेतलेल्या नागरिकांना प्रवेश बंदी असणार आहे. फेब्रुवारी महिन्यापर्यंत जर्मनीत लसीकरण अनिवार्य करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोरोनाची जर्मनीतील चौथी लाट आतापर्यंतची सर्वात गंभीर आहे, काल दिवसभरात आणखी 388 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ओंमिक्रॉनमुळे देखील चिंता व्यक्त केली जात आहे. आगामी काही महिन्यात कोरोनामधील निम्मी प्रकरणे ही ओमिक्रॉनशी संबंधित असण्याची भीती युरोपियन युनियनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर अमेरिकेनेही निर्बंध लावले आहेत. अमेरिकेत येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी कोरोना चाचणी राष्ट्रपती जो बायडेन यांनी अनिवार्य केली आहे. अमेरिकेत येणाऱ्या प्रवाशांना प्रवासाच्या 24 तास आधी कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सादर करणे बंधनकारक असेल. शिवाय प्रवाशांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे, असे निर्बंध लावण्यात आले आहेत. हा नवा नियम पुढील आठवड्यापासून लागू करण्यात येण्याची शक्यता आहे. सध्या अमेरिकेत येणाऱ्या प्रवाशांना प्रवासाच्या 72 तासआधीचा कोरोनो निगेटिव्ह अहवाल बंधनकारक होता.