ओमिक्रॉन विरोधात ‘या’ कंपनीचे औषध प्रभावी ठरल्याचा दावा


लंडन: जगासह देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट काहीशा प्रमाणात कमी होत असतानाच दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिअएंट आढळून आल्यामुळे सगळ्यांचा जीव पुन्हा एकदा टांगणीला लागला. आता भारतातही या व्हेरिएंटने शिरकाव केला असून कर्नाटकमध्ये कालच दोन रुग्ण आढळले आहेत. त्यातच आफ्रिकेहून आलेले १० जण बेपत्ता असल्यामुळे काळजी आणखी वाढली आहे. कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने चिंता वाढवलेली असतानाच लंडनहून दिलासादायक बातमी आली आहे.

ब्रिटिश कंपनी ग्लॅक्सो स्मिथक्लाईनने कोविड१-९ विरोधात तयार केलेले अँटिबॉडी औषध नव्या सुपर व्हेरिएंटविरोधात प्रभावी ठरत असल्याचा दावा केला आहे. कंपनीकडून हा दावा प्राथमिक चाचण्यांनंतर करण्यात आला आहे. अमेरिकन कंपनी व्हीआयआर बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने ग्लॅक्सो स्मिथक्लाईनने सोट्रोविमॅबची निर्मिती केली आहे.

७९ टक्क्यांनी सोट्रोविमॅबमुळे हलक्या, मध्यम आणि अधिक जोखीम असलेल्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होत असल्याचा दावा आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचा अनुक्रम पाहता सोट्रोविमॅब या व्हेरिएंटविरोधात प्रभावी असेल अशी शक्यता आहे, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. कंपनीने प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या प्राथमिक परिक्षणांच्या मदतीने डेटा तयार केला आहे.

व्हीआयआर बायोटेक्नॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉर्ज स्कॅनगोस यांनी सोट्रोविमॅबची निर्मिती जाणूनबुजून एका म्युटेटिंग विषाणूला लक्षात ठेऊन करण्यात आली होती, अशी माहिती दिली. जीएसके आणि व्हीआयआरने तयार केलेले सोट्रोविमॅबचा एक डोस घ्यावा लागतो. कोरोनाची लक्षणे आढळून आल्यानंतर ५ दिवसांच्या आत सोट्रोविमॅब देण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.