कोरोना काळातील कामासाठी महाराष्ट्र सरकारमधील तिन्ही पक्षांच्या लोकांना भारतरत्न देण्याची आवश्यकता – सुजय विखे पाटील


नवी दिल्ली – ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या नव्या संकटाविषयी गुरुवारी लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात चर्चा करण्यात आली. अहमदनगरचे खासदार सुजय विखे यांनी यावेळी ओमिक्रॉनपेक्षा व्हायरल न्यूजचाच जास्त धोका असल्याचे म्हटले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या देशातील लसीकरणाच्या प्रमाणपत्रांवरील फोटोवर आक्षेप घेतला जात असेल तर महाराष्ट्रात घडलेल्या घटनांमध्ये मृत्यू झालेल्या लोकांच्या मृत्यू प्रमाणपत्रांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोटो लावायला हवा, असे सुजय विखे यांनी म्हटले आहे.

ओमिक्रॉनवर ज्या पद्धतीने चर्चा केली जात आहे, त्याबाबत आधी समजून घेतले पाहिजे. कुठलाही व्हायरस आला तर त्याचे म्युटेशन होते. याआधीही अल्फा, डेल्टा असे व्हेरिएंट आले आहेत आणि ओमिक्रॉन त्यातील एक आहे. म्युटेशन का होते आणि तो अतिशय धोकादायक का आहे याच्यावर दुर्दैवाने कोणाचा अभ्यास नाही. जागतिक लसीकरण जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत असे व्हेरिएंट येतच राहणार आहेत. ओमिक्रॉनने काय धोका होईल, यावर कोणताही अभ्यास झालेला नाही. भीती घालण्यासाठी नव्या व्हेरिएंटच्या नावाची चर्चा होते, असे एबीपी माझासोबत बोलताना सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारच्या तिन्ही पक्षांच्या लोकांना कोरोना काळातील कामासाठी भारतरत्न देण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्र सरकारने अद्याप एकही लस विकत घेतलेली नाही. अद्याप बुस्टर डोसबाबत जागतिक आरोग्य संघटनेनेही परवानगी दिलेली नाही. तरीही सरकारवर आरोप केले जात आहे. पुढचा धोका लहान मुलांना असल्याचे सांगितले जाते. त्यातील किती लहान मुले पॉझिटिव्ह झाली? माझी सर्वांना विनंती आहे या सर्व विषयांवर त्यांनी अभ्यासपूर्वक बोलावे. गुगलमध्ये सर्च करुन भाषण करणे आणि लोकांमध्ये भीती निर्माण करणे चुकीचे असल्याचे सुजय विखे म्हणाले.

लसीकरणाच्या प्रमाणपत्रांवर जर पंतप्रधान मोदींचा फोटो छापला तर मृत्यू प्रमाणपत्रांवरही त्यांचा फोटो छापायची जबाबदारी घ्यावी लागेल, असे शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी लोकसभेत म्हटले. सुजय विखेंनी त्यावर प्रतिक्रिया दिली. मोदींचा फोटो लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर छापला गेला असेल मग अहमदनगर जिल्ह्यामध्ये झालेल्या अग्नितांडवामध्ये १२ रुग्णांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या मृत्यू प्रमाणपत्रावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा फोटो छापायचा का? नगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी, एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्याही मृत्यू प्रमाणपत्रावर मुख्यमंत्र्यांचा फोटो छापायचा का? राजकारण करायची वेळ आली, तर जशास तसे उत्तर देण्यासाठी आम्ही कमी पडणार नाही. राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी, शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, मग या हिशोबाने मला वाटते सर्वात जास्त मृत्यू प्रमाणपत्रांवर महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरेंचे फोटो लागतील, असे सुजय विखे म्हणाले.